Friday, April 26, 2024
Homeनगरलाचखोर रामोड यांच्यासाठी विखे पाटील यांची शिफारस

लाचखोर रामोड यांच्यासाठी विखे पाटील यांची शिफारस

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची पुण्यातून बदली होऊ नये यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच शिफारस केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भात दानवे यांनी विखे -पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले शिफारसपत्र काल ट्विट केले.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते दानवे यांनी विखे पाटलांवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे,. डॉ. अनिल रामोडला आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे. रामोड याची बदली पुण्यातून करू नये, यासाठी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारस पत्र लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी याच महिन्यात शिफारस केली होती.

डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने 10 जूनला अटक केली असून सीबीआयच्या मागणीनंतर विभागीय आयुक्तालयाने त्यांचे निलंबन केले आहे. परवानगी घेतल्याशिवाय पुण्याबाहेर जाऊ नये, असेही आदेशात नमूद केले आहे.

रामोड यांच्या घरातून सहा कोटी 64 लाख रुपये आणि कार्यालयातून एक लाख 28 हजार रुपये सीबीआयने जप्त केले आहेत. तपासात त्यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावे पाच कोटी 30 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले. भूधारकांची प्रकरणे निकाली काढताना घेतलेल्या पैशांतून ही मालमत्ता उभी केली असण्याची शक्यता सीबीआयने वर्तवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या