Friday, April 26, 2024
Homeनगरअमरधाम सुशोभीकरणाच्या कामातील गैरव्यवहाराप्रकरणी पालिकेच्या दोघा अभियंत्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

अमरधाम सुशोभीकरणाच्या कामातील गैरव्यवहाराप्रकरणी पालिकेच्या दोघा अभियंत्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगर परीषद हद्दीतील अमरधामच्या सुशोभिकरण व नुतनीकरण टप्पा क्र 2 व 3 मधील कामे निविदा काढण्यापुर्वीच केलेली असताना तसा त्याचा स्थळपाहणी अहवाल सादर करणे आवश्यक असताना तसे न करता निविदा काढून फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याने संगमनेर नगर परिषदेमधील दोघा अभियंत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने अमरधामच्या सुशोभीकरणाचे व नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवर झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी केला होता. झालेल्या कामाचे पुन्हा टेंडर काढल्याने संबंधित ठेकेदार व पदाधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली होती.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर याची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये नगरपालिकेचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी यांना जबाबदार धरण्यात आले. त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश कारभारी शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी संगमनेर नगर परिषदेचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 808/2022 भारतीय दंड संहिता कलम 420, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे हे करीत आहे.

संगमनेर नगर परिषद च्या माध्यमातून डिसेंबर 2021 मध्ये दोन निवीदा मागविण्यात आले होते. 24 लाख 88 हजार 442 आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीतुन 9 लाख 16 हजार 66 अशा निविदा मागविण्यात आल्या होत्या. नगर परिषद फंडातून शहरातील अमरधाम येथे विविध विकास कामे व सुशोभिकरण करणे करीता दि. 22/11/2021 रोजी प्रसिद्धीद्वारे मागविल्या होत्या. दि. 7 डिसेंबर 2021 रोजी निवीदा उघडणेस ठरविले. मात्र दोन्हीही निविदामध्ये प्रस्तावीत विविध कामे ही यापूर्वी काढलेल्या रक्कम 63 लाख 19 हजार 733 या निवीदा द्वारे दिलेल्या दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजीचे कार्यारंभ आदेशाने दि. 25 डिसेंबर 2020 रोजी पुर्ण झालेल्या व बील अदा केलेल्या निविदेतच पूर्ण केलेली आहेत.

अमरधामच्या कामाची चौकशी करण्यात आली. यात दोघा अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमरधाम च्या कामातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत अ‍ॅड. गणपुले यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर चौकशी होवून श्रीरामपूरच्या मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याला मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी यासाठी आपण कायदेशीर पाठपुरावा करणार असल्याचे गणपुले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या