Friday, April 26, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ शेख यास 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ शेख यास 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

संगमनेर (प्रतिनिधी) –

अल्पवयीन मुलाला मारहाण, शिवीगाळ करुन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी

- Advertisement -

अल्ताफ ऊर्फ लाला असिफ शेख (रा. कुरण) यास काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्याचार करणारा नराधम हा पिडीत बालकाचा सावत्र पिता आहे.

शहरातील एका उपनगरात राहणार्‍या 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर हा प्रसंग ओढावला आहे. पतीचे अपघातात निधन झालेली महिला आपल्या दोन मुलांसह शहरातील एका उपनगरात राहत आहे. पती निधनानंतर कुटुंबाला आधार म्हणून तिने कुरण येथील अल्ताफ आसिफ शेख याच्याबरोबर दुसरा विवाह केला होता. सदर महिलेचा स्वतःचा व्यवसाय असल्याने ती बाहेरगावी गेली होती. दोन मुले घरीच होती. रात्री त्या मुलांचा सावत्र पिता हा दारुच्या नशेतच घरी आला.

त्याने मुलाला सांगितले की, मला तुझ्या मम्मीशी बोलायचे आहे, तिला फोन लाव, त्यावर दोन्ही पैकी मोठ्या मुलाने सांगितले की, मी आत्ताच मम्मीशी बोललो आहे, तुम्ही उद्या बोला, याचा अल्ताफ शेख यास राग आला. त्याने त्या मुलाला शिवीगाळ व मारहाण केली. दोन्ही मुलांच्या रडण्याच्या आवाजाने शेजारच्या महिलेने खोलीकडे धाव घेत विचारपूस केली असता, अल्ताफ शेख हा इसम त्या मुलांना मारहाण करीत असल्याचे दिसले. ते पाहून तुम्ही लहान लेकरांना का मारता? अशी विचारणा त्या महिलेने केली, असता ही माझी मुलं आहेत, मी त्यांच्याशी काहीही करील, तुम्हाला काय करायचं, असे उद्धटपणे म्हणून त्या महिलेला त्याने काढून दिले.

त्यानंतर रात्री 12.30 वाजेच्या सुमारास त्याने 14 वर्षाच्या मुलासोबत जबरदस्तीने अनैसिर्गक कृत्य केले. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा सावत्र पित्याने तेच कृत्य केले. त्यानंतर अत्याचार करणार्‍या सावत्र पित्याची नजर चुकवून त्या बालकाने शेजारी राहणार्‍या महिलेच्या घरात आश्रय घेतला. तिच्याच मोबाईलवरुन आपल्या आईला झालेला प्रकार कथन केला. घाबरलेल्या त्या आईने थेट शहर पोलिसांना भ्रमणध्वनीवरुन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेथे घराला कुलूप होते तर पिडीत बालक हा शेजारच्या महिलेच्या घरात मिळून आला. पोलिसांनी त्यास विश्‍वासात घेतल्यावर त्याने अल्ताफ शेख या इसमाने आपल्या 8 वर्षाच्या भावाला कुरण येथे नेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. कुरण येथे त्यास पोलिसांनी ताब्यात घेत 8 वर्षाच्या बालकाची सुटका केली.

सदर बालकाच्या फिर्यादीवरुन अल्ताफ शेख याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास पोलिसांनी अटक करुन काल जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहे. या घटनेने कुरण ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

या घटनेत अल्ताफ शेख याला कुणी साथीदार होता का? याची माहिती पोलीस घेत आहे. पिडीत बालकावर कुणाचा दबाव आहे का? याचीही पडताळणी पोलीस करत आहे. अल्ताफ शेख याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला साथ देणार्‍या साथीदाराचाही पोलीस शोध घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या