Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखरेदीचा ‘अक्षय्य’ मुहूर्त

खरेदीचा ‘अक्षय्य’ मुहूर्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अक्षय्यतृतीयेला सोने खरेदी करणे शुभ असते असा मानस आहे. या दिवशी सोन्याच्या रूपातून भाग्यलक्ष्मी घरात प्रवेश करते. म्हणूनच लक्ष्मीची आराधनादेखील केली जाते. कुटुंबाची भरभराट व्हावी या उद्देशाने सोन्यासह अन्य गोष्टीदेखील खरेदी करणे लाभदायक असते. कुटुंबाची भरभराट व्हावी या उद्देशाने सोन्यासह अन्य गोष्टीदेखील खरेदी करणे लाभदायक असते. शुभमुहूर्त पाहून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

- Advertisement -

मराठी महिन्यांपैकी वैशाख महिना हा दुसरा महिना. यावेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर पडलेला असतो म्हणून याला वैशाख वाणवादेखील म्हणतात. या महिन्यात महत्त्वाचे सण व उत्सव येतात. त्यात अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मोठा सण आहे. अक्षय म्हणजे जे संपत नाही ते. म्हणून या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट अक्षय होते, अशी धारणा आहे.

या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. लग्न करणार्‍या जोडप्यांच्या आयुष्यात सदैव सुख-समृद्धी नांदते. अक्षय्यतृतीयेला सोने खरेदी करणे शुभ असते, असा मानस आहे. या दिवशी सोन्याच्या रूपातून भाग्यलक्ष्मी घरात प्रवेश करते. म्हणूनच लक्ष्मीची आराधनादेखील केली जाते. कुटुंबाची भरभराट व्हावी या उद्देशाने सोन्यासह अन्य गोष्टीदेखील खरेदी करणे लाभदायक असते. शुभमुहूर्त पाहून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या दिवशी नागरिक विविध योजनांचा फायदा घेऊन इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी मोठ्या आकारातील वस्तूंचे बुकिंग केल्याचे सांगितले जात आहे.

सोने खरेदी

हिंदू धर्मात सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्याची पूजा केली जाते, म्हणूनच या दिवशी खरेदी केलेले सोने जास्त पवित्र मानले जाते. या दिवशी सामान्य माणूसदेखील किमान गुंजभर सोने खरेदी करतोच. ज्यांना सोने शक्य नाही असे लोक चांदी खरेदी करतात. कारण सोने हे समृद्धीचे प्रतीक आहे. अक्षय्यतृतीया आणि हे वर्षानुवर्षांचे समीकरण बनलेले आहे. मुळातच सोने खरेदी हे भारतीयांच्या जिव्हाळाच्या विषय. सण, विवाह समारंभ, धार्मिक कार्यक्रमात महिलावर्ग हमखास सोन्याचे दागिने घालण्यासाठी उत्सुक असतात. पूर्वी केवळ दागिन्याच्या रूपात किंवा धातूच्या रूपात सोन्याची खरेदी केली जात होती. आता बाँड, म्युच्युअल फंड, नाण्याच्या स्वरुपातही सोने मिळू लागल्याने खरेदीदारांचा ओढा वाढला आहे. सोन्यातील गुंतवणूक शाश्वत मानली जात असल्याने आजही सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते.

दागिन्यांच्या रूपातील सोने खरेदी हा सर्वात आवडता आणि लोकप्रिय प्रकार मानला जातो. सोन्याचे बार, नाणे खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. त्यावर मेकिंग चार्जही आकारला जात नाही. गोल्ड इक्स्चेंज ट्रेडेड फंडस् (इटीएफ) ही अलीकडच्या काळात सोने खरेदीतील अत्यंत लोकप्रिय पद्धत मानली जात आहे. अशाप्रकारची खरेदी म्युच्युअल फंडमार्फत केली जाते. प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा ती खरेदी युनिटच्या स्वरुपात केली तर ती अधिक सोपी आणि सुरक्षित मानली जाते.

यावर आकारण्यात येणारे करही माफक असल्याने नवीन पिढीतील गुंतवणूकदार इटीएफला प्राधान्य देत आहेत. आजकाल सोने तारण ठेऊनदेखील कर्ज मिळत असल्याने सोने हे अडचणीच्या काळातही उपयोगी पडू शकते. सोने खरेदी करणे खूपच सुलभ असल्याने सामान्यातील सामान्य गुंतवणूकदार सोन्यालाच प्राधान्य देतो. एक ग्रॅमपासून किलोपर्यंत सोने मिळत असल्याने सोने खरेदी सोपी आणि सहज बाब मानली जाते. गोल्ड इटीएफची खरेदी करून कालांतराने ती विकून दृश्य स्वरुपातील सोने खरेदी करू शकतो किंवा आणखी गुंतवणूक करू शकतो. इटीएफमुळे सोने सांभाळण्याची झंझट नाही आणि सोने खरेदीचेही समाधान लाभते.

चांदीची भांडी

आपल्याकडे सोन्याप्रमाणे चांदी हा धातूदेखील शुभ आणि पवित्र मानला जातो. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी चांदीची भांडी, नाणी किंवा अन्य गोष्टी खरेदी केल्याने घरात लक्ष्मी प्रवेश करते अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. बरेचसे लोक या दिवशी प्रियजनांना चांदीच्या वस्तू भेट देत असतात.

वाहन खरेदी

मुहूर्तावर खरेदीमध्ये वाहन खरेदी हमखास असते. दरवर्षी या दिवशी वाहन खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. मुहूर्त साधण्यासाठी जवळपास एक आठवडा आधीपासून वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू होते. आकर्षक ऑफर्स आणि कर्जसुलभता यामुळे वाहन खरेदी अत्यंत सोपी झाली आहे. अनेक विक्रेते ग्राहकांना सोयीस्कर होईल अशी किंमत भरूनही (डाऊन पेमेंट) वाहन देण्यास तयार झालेले दिसतात. या सर्व सुविधांचा लाभ घेऊन दुचाकी तसेच चारचाकी वाहने घेण्याचा अक्षय्यतृतीयाचा मुहूर्त साधतात. बुकिंग आधी करून वाहन घरी नेण्याची प्रथा आहे. अनेकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे आधीच बुकिंग केले आहे. यंदा इलेक्ट्रिक वाहनांचा टक्का वाढणार असा अंदाज आहे.

कृषी उपकरणे

हा दिवस ट्रॅक्टर आणि शेतीशी संबंधित अन्य यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठीचा आदर्श दिवस असतो. या दिवशी शुभ मुहूर्तावर खरेदी केलेल्या उपकरणांचा शेतीच्या कामांमध्ये वापर केल्याने भरभराट होते, असे मानले जाते.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे

अक्षय्यतृतीयेला खरेदी केलेल्या विद्युत उपकरणांमध्ये लवकर बिघाड होत नाही, ती जास्त काळासाठी टिकून राहतात, असा लोकांमध्ये समज आहे. म्हणून या दिवशी बहुतांशजण विद्युत उपकरणे विकत घेण्यासाठी गर्दी करतात.

गृहस्वप्नपूर्तीचा मुहूर्त

या दिवशी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे खूप शुभ असते. दीर्घकालीन सुख-समृद्धी टिकून राहावी यासाठी अनेकजण या दिवशी जागा खरेदी करतात. हा दिवस व्यवहारासाठी उत्तम असतो. अनेकांच्या आयुष्यात घर खरेदी प्रथमच होत असते तर काहीजण गुंतवणूक म्हणून मालमत्तेकडे पाहतात. घर किंवा मालमत्तेत केलेली जाणारी गुंतवणूक दीर्घकाळासाठी समजली जाते. ही गुंतवणूक अत्यंत सुरक्षित असून शेअर बाजाराप्रमाणे यात चढ-उतार येत नाहीत. घर, फ्लॅट भाड्याने देऊन त्यातून नियमित उत्पन्नाची सोय करता येते.

मुहूर्तावर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गृहप्रकल्पांमुळे उपनगरांचाही विस्तार झाला आहे. या दिवशी गृहप्रवेश करणेही शुभ समजले जाते. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी भरघोस सूट, आकर्षक पेमेंट योजना अशा ऑफर्स देऊ केल्या आहेत. याशिवाय सरकारी धोरण, गृहकर्जावरील कमी व्याजदर यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक चित्र पाहायला मिळेल. अनेकजण आपल्या ‘ड्रीम होम’चे स्वप्न पूर्ण करतील आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या