Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोले तालुका एज्युकेशन सोसायटी वाद; पत्रकार परिषदेत एकमेकांवर चिखलफेक

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी वाद; पत्रकार परिषदेत एकमेकांवर चिखलफेक

पिचडांनी सदस्यांची बैठक रद्द करुन शब्द फिरवला – आ. डॉ. लहामटे

19 मे रोजी तहसिल कचेरी समोर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

- Advertisement -

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले एज्युकेशन संदर्भातील आंदोलनात माजी मंत्री पिचड यांनी चर्चेत सर्व मागण्या माण्य करुन त्याप्रमाणे नियोजित चार सदस्यांची बैठक रद्द करुन शब्द फिरवला असल्याने आता सर्वपक्षीय व आंदोलक दि. 19 मे 2022 रोजी तहसिल समोर आत्मक्लेष आंदोलन करणार असुन आता जनरेटाच उभा राहणार असल्याचा इशारा आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे.

अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर आ. डॉ. किरण लहामटे व आंदोलक यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, अशोकराव भांगरे, माकपचे डॉ. अजित नवले, राष्ट्र सेवादलाचे विनय सावंत, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, आर पी आय चे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे, काँग्रेसचे मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे विठ्ठलराव चासकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, अगस्ती कारखान्याचे संचालक कचरु पा. शेटे, आर पी आय चे चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदिप कडलग, अ‍ॅड. के. बी. हांडे, युवा स्वाभिमानीचे सुरेश नवले आदि उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, अकोले एज्युकेशन मुख्य ट्रस्टी माजी मंत्री पिचड यांनी आंदोलनाची तीव्रता ओळखल्याने आमच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली. यावेळी आमच्या आंदोलकामध्ये फूट पाडण्याचाही प्रयत्न केला. माझ्यासह अशोकराव भांगरे, डॉ. अजित नवले यांचे सोबत चांगली चर्चा करताना विजयराव वाकचौरे, मिनानाथ पांडे व विनय सावंत यांचा अवमान करुन आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत चांगली चर्चा झाली. मला वाटले वयाप्रमाणे चांगली बुद्धी आली. संस्थेच्या हिताचा निर्णय घेत आमच्या 14 मागण्या मान्य केल्या मात्र इतर मित्रांनी मला सांगितले होते तसेच घडले.

पिचडांनी विश्वासघात केला व आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांची व संस्थेची बदनामी केल्याचे कारण देत आज आमच्या चार सदस्य बरोबरची होणारी बैठक रद्द केली. आम्ही केवळ आमच्या आंदोलना बाबत जनतेच्या मनात शंका उपस्थित होऊ नये म्हणून प्रेस नोट काढली. यांनी तर उलट चर्चेत मागण्या मान्य केल्यावर ‘जैसे थे’ परिस्थिती ठरवायची असताना आमच्या राष्ट्रवादीच्या गायकर यांचेसह ट्रस्टीचा व इतर सदस्यांचा राजीनामा मंजूर करुन धर्मादाय आयुक्ताकडे पाठवण्याची घाई का केली? सिताराम पा. गायकर काही अश्या या पदांना चिटकुन बसणारे नाहीत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामा दिला होता तो मागे घेण्यासाठी नाही.

आता पिचड यांनी शब्द फिरवला असल्याने कोणतीही चर्चा नाही त्यांनी आमच्या 14 मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आता आमचा सर्वपक्षीय जनरेटा उभा राहणार आहे. कारण आंदोलन संपले नव्हते दुसरा टप्पा थांबवला होता. आता येत्या 18 तारखेला आंदोलनाला 1 महिना पूर्ण होत असल्याने 19 मे ला आपण व सर्व नेते महाविकास आघाडीतील सर्व पक्ष व शिक्षण प्रेमी लोक आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे.

याप्रसंगी डॉ. अजित नवले म्हणाले, माजी मंत्री पिचड यांनी बोलावलेली बैठक खोटं बोलून बैठक रद्द केली. आम्ही कोणतीही पत्रकं काढली नाही, आम्ही संसदीय पद्धतीने प्रेस नोट काढली तर यांना राग आला आहे.

ज्येष्ठ नेते सीताराम पा. गायकर म्हणाले कि, संस्थेचे चीफ ट्रस्टी असलेल्यांनी अकोले एज्युकेशनच्या उभारणीत काय योगदान दिले ते सांगावे. सर्व काही पाहिजे ते यांनाच पाहिजे हि वृत्ती पिचडांची आहे. आपण दिलेले राजीनामे हे संस्था वाचवण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी होता संस्था वाचवण्यासाठी राजीनामा काय अजूनही काही लागले ते देण्याची आपली तयारी आहे. शेवटी आभार राष्ट्रसेवा दलाचे विनय सावंत यांनी मानले.

संघर्षच करायचा असेल तर आम्हीही तयार

संस्थेची बदनामी करणार्‍यांवर अब्रु नूकसानीचा दावा दाखल करणार – वैभव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

ज्यांनी राज्याच्या मंत्री पदाचा दोन वेळा राजीनामा दिला, त्या पिचड यांचेसाठी या संस्थेचे विश्वस्त पद मोठे आहे का? शिक्षण संस्थेत राजकारण नको म्हणून चर्चेची संधी दिली तर बदनामी करता. तुम्हाला संघर्षच करायचा असेल तर पाहिजे त्या संघर्षास आपण तयार आहोत असा इशारा देऊन संस्थेची बदनामी करणार्‍यांवर अब्रु नूकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे माजी आमदार व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त वैभव पिचड यांनी दिला आहे.

अकोले एज्युकेशन संस्थेविरोधात आंदोलकांनी काल पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी अकोले एज्युकेशन संस्थेच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत श्री. पिचड बोलत होते. यावेळी कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, भाजपचे ज्येेष्ठ नेते शिवाजी धुमाळ, अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य काँग्रेसचे डॉ. डी. के. सहाणे, रमेशराव जगताप, शेतकरी संघटनेचे शरद देशमुख, कम्युनिस्ट पक्षाचे अ‍ॅड. आनंदराव नवले तसेच यशवंतराव आभाळे, कल्पनाताई सुरपुरिया, सुधाकर आरोटे, राजेंद्र डावरे, राहुल देशमुख, शंभू नेहे, विजय पवार, किशोर काळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पिचड म्हणाले की, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या दि.09/07/1978 रोजीच्या बैठकीतील ठरावानुसार घटना दुरुस्ती केलेली आहे. त्यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे विश्वस्त नव्हते. त्यानंतर त्या घटनेनुसारच माजी मंत्री पिचड यांनी कार्यकारिणी आजपर्यंत निवडलेली आहे. आजपर्यंत कधीही कार्यकारिणीला विरोध झाला नाही मात्र आताच्याच कार्यकारिणीला विरोध होत आहे हे द्वेषाचे राजकारण आहे. कारण या कार्यकारिणीत वकील, इंजिनिअर, शिक्षक, डॉक्टर अशी सुशिक्षित व सर्वपक्षीय कार्यकारिणी असताना त्यांना दोष देण्याचा अधिकार यांना कुणी दिला? कोणे किती सज्जन आहे हे सांगायला लावू नका? कार्यकारिणीला विरोध यांना घेतले नाही म्हणूनच केला जात आहे.

तालुक्यातील एक टोळी ही प्रत्येक संस्थेत हवी आहे, या टोळीनेच तालुक्यातील संस्थांचे वाटोळे केले आहे. अमृतसागर दूध संघाचा ठराव हवा होता तर बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक होते. माजी मंत्री पिचडांनी राजकारणात यांना बरोबरीचे स्थान दिले. प्रसंगी मी मुलगा असतानाही मला बाजुला ठेऊन या टोळीला संधी दिली. घराणेशाहीमुळेच अशोकराव भांगरे या संस्थेवर कायम राहिले. विनय सावंत घराणेशाहीवर बोलतात मग त्यांच्या बारीतील संस्थेत त्यांचे वडील, आई, बहिण व मेहुणे असे कुटुंबच संस्था चालवते मग ही संस्था देखील अगोदर सार्वजनिक करा. या संस्थेसाठी देवस्थानांच्या जमिनी लाटल्या गेल्या.

2019 च्या विधानसभा निवडणूकीतील माझ्या पराभवानंतर सर्व बरोबर असलेले सोडून गेले, सुखात सगळेच बरोबर असतात पण दु:खात कोणी नसते म्हणतात परंतु नगरपंचायत निवडणूकीत ही टोळी गेल्याने तरुण कार्यकर्ते आपल्या मागे उभे राहिले त्यामुळेच नगरपंचायतमध्ये यश मिळाले. तालुक्यात मी केले म्हणणार्‍यांनी शाहुनगरच्या रहिवाशांची जागा अद्याप नावावर होत नाही मग यांच्या घराची जागा कशी नावावर झाली? ते काढायचे का? अशी टिका श्री. पांडे यांचे नाव न घेता केली.

शिवाजी धुमाळ म्हणाले, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी, त्यात बिगर राजकीय पाच लोकांची त्रयस्थ समिती निवडून या समितीने कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड व सिताराम गायकर यांचेबरोबर बैठक करुन 14 मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, सत्ताबाह्य केंद्र व सुकाणू समिती असलेल्यांबरोबर चर्चा का करायची? नगरपंचायत निवडणूकीत एकमेकांना शिव्या देणारे विकृत लोक एकत्र आलेत.

पिचड साहेबांनी सर्वांना बरोबर घेतले हीच मोठी चुक झाली. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत तुम्ही अपघाताने आमदार झालात, हिम्मत असेल तर या आमदारकीचा राजीनामा देऊन 2022 लाच निवडणूक लावा, डिपॉझीट जप्त होईल. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला आमदार केले पण तुम्ही जनतेच्या अन्नात माती कालवण्याचे काम करत आहात. बहुजन नेते म्हणजे काय? आम्ही बहुजन नेते नाही का? बहुजन नेते म्हणणार्‍यांनी 40 वर्षे हजामत केली का? राजीनामा देणे यांचे नाटक होते. नाटक करुन ब्लॅकमेल करण्याचा यांचा डाव होता. आमच्या नेतृत्वावर यापुढे टिका कराल तर आम्ही गप्प बसणार नाही. यावेळी डॉ. डी. के. सहाणे, शरदराव देशमुख, यशवंत आभाळे यांनी आपले मत व्यक्त केले. स्वागत संस्थेचे अध्यक्ष सुनिल दातीर यांनी केले, आभार रमेश जगताप यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या