Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले-संगमनेर रस्त्याची चाळण, जोडीला धूळ

अकोले-संगमनेर रस्त्याची चाळण, जोडीला धूळ

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले- संगमनेर रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

- Advertisement -

या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या दुचाकी-चार चाकी वाहन चालकांना अक्षरशः कसरत करीत वाहने चालवावी लागत असून नियमित ये-जा करणार्‍यांचे मणके ढिल्ले झाले आहेत.

जोडीला रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत असून वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. शासन -प्रशासन असे कुणी या रस्त्याला वाली आहे की नाही? अशी सद्यस्थिती आहे.

कोल्हार- घोटी राज्य मार्गावरील बारी ते संगमनेर या रस्त्याचे काम हायब्रीड अ‍ॅन्युटी अंतर्गत सुरू असून सुमारे 205 कोटी रुपयांचे हे काम गतवर्षीपासून सुरू आहे. या दोन वर्षांच्या काळात रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने करावयाचे असल्याचे समजते. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला काही रक्कमही दिली असल्याची चर्चा आहे.

रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देत नाही तर संबंधित ठेकेदारही ते काम करत नाही. त्यामुळे अकोले ते संगमनेर दरम्यान या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झालेली दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून याचा त्रास वाहनचालक सहन करत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वाहने कामावर आली आहेत. वाहन चालक व प्रवासी यांना कंबरदुखी, मणक्याचे आजार जडले आहेत.

अकोले-संगमनेर भागातील लोकांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. दुचाकी चारचाकी वाहनांची रस्त्यावर गर्दी असते. मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.

अनेकाच्या दुचाकी खड्ड्यात आदळून अथवा सरकून अपघातही झालेले आहेत. रस्त्यावर निकृष्ट दर्जाचा मुरूम व माती टाकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीला सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेच्या जीवाशी अक्षरशः खेळत आहे.

दिवाळीच्या अगोदर माजी आमदार वैभव पिचड यांनी संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. नंतर काही दिवस उलटून गेल्यावर संबंधित ठेकेदाराने खड्डे बुजविणेचे काम ही सुरू केले. अकोलेकडून संगमनेरला जाणार्‍या सुगाव बुद्रुक फाट्याच्या परिसरात काम सुरू झाले.

मात्र आमदार डॉ. किरण लहामटे समर्थक एका कार्यकर्त्याने निकृष्ट काम होत असल्याचे विरोधकांच्या आरोपामुळे हे काम बंद पाडले. विरोधी कार्यकर्ते हे लोकप्रतिनिधी यांना बदनाम करत असल्याचे संबंधित कार्यकर्त्याचे म्हणणे होते, तशी पोस्टही त्याने सोशल मीडियावर टाकली होती. आता सुगाव बुद्रुक फाटा ते अकोलेकडे जाणार्‍या गाजरीच्या ओहोळपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम काल सुरू होते.

सध्या रस्त्याच्याकडेच्या साईड पट्ट्या खोदकाम करून, खडी टाकून मजबूत करण्याचे काम सुरू आहे पण ते संगमनेर तालुक्याच्या हद्दीत सुरू आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील रस्त्याचे काम हे अनेक दिवस होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान सत्ताधारी व विरोधकांच्या एकमेकांच्या जिरवाजिरवीमुळे अकोले -संगमनेर रस्त्याच्या कामाला अडथळे निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. रस्त्याचे काम सुरू करावयाच्यावेळी किमान इंदोरी फाटा ते निमाई डेअरी पर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे असलेल्या रस्त्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे होते.

त्यातच दोन्हीही तालुक्यांतील विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी आमदार, माजी मंत्री, खासदार, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संबंधित खात्याचे अधिकारी या रस्त्यावरून ये-जा करताना डोळ्यांवर पट्टी बांधून प्रवास करतात का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य वाहनचालक व प्रवासी करत आहेत. वाहनचालक व सर्वसामान्य माणसांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. आता तर सर्वसामान्य लोक सत्ताधारी व विरोधकांच्या या गलिच्छ राजकारणाला पूर्णपणे कंटाळले आहेत.

सरकारच्या सार्वजनिक बांधकाम व जीवन प्राधिकरण या विभागातील वादात तालुक्यातील जनता भरडली जात आहे. कोल्हार-घोटी रस्त्याच्या कामात अकोले शहर व 32 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे रस्त्याचे कामही थांबले व पाणीपुरवठा योजनेचे कामही थांबले आहे.

आता ही पाईपलाईन दुरूस्त कोण करणार? यावर सार्वजनिक बांधकाम व जीवन प्राधिकरण या विभागात वाद आहे. त्यामुळे शासनाच्या या दोन विभागांच्या वादात जनतेला पाणी नाही व रस्ता दुरुस्तीही नाही अशी दुहेरी फरपट तालुक्यातील जनतेची सध्या सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांनी या महत्त्वाच्या प्रश्नी एकत्रित येण्याची गरज आहे.

अकोले तालुक्यातून नाशिकला जाण्यासाठी देवठाण-दापुर मार्गे सिन्नर या जवळच्या मार्गाचा लोक वापर करत असतात. अकोले तालुक्याची हद्द सोडल्या नंतरचा रस्ता पाहिल्यावर सत्ताधारी तर सोडा विरोधक सुद्धा ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक केल्या शिवाय रहात नाहीत. पण अकोले -संगमनेर ला आजी-माजी मंत्री असतांना देखील मुख्य रस्ता असलेल्या अकोले- संगमनेर या 22 कि. मी. रस्त्याचे शेजारच्या जिल्ह्याप्रमाणे रस्त्यांचे रुंदीकरण व मजबूतीकरण काम होऊ शकत नाही ही खंत तालुक्यातील जनता व्यक्त करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या