Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोल्यातील गावे जंगलात आहेत का ? नागरीकांचा सवाल

अकोल्यातील गावे जंगलात आहेत का ? नागरीकांचा सवाल

अकोले|प्रतिनिधी|Akole

संगमनेर शहरात भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करावयाचा म्हणून अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील गावात पकडलेले कुत्रे सोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नागरिकांनी संबंधित वाहनचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यासंबंधी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर येथे पकडलेले कुत्रे जंगलात सोडवायचे म्हणून हे कुत्रे कळस, कुंभेफळ, सुगाव, रेडे या परिसरात सोडण्यात आल्याने ही गावे म्हणजे जंगल आहेत का? असा संतप्त सवाल अकोलेकरांनी केला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात पो.कॉ. गणेश नामदेव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने विनापरवाना बेकायदा आठ बेवारस मोकाट लहान मोठी कुत्रेे टेम्पो नंबर एम. एच. 14 ए. झेड. 787 मध्ये संगमनेर नगरपालिका हद्दीतून भरून ते समशेरपूर तालुका अकोले येथे घाटात सोडण्यासाठी जात असताना कुंभेफळ येथे निर्दयतेने व दाटीवाटीने टेम्पोमध्ये भरलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.

त्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेश व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 (1) भारतीय साथ रोग आधिनियम 1897 व सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसूचना करोना 2020 प्र. क्रमांक 58 आरोग्य 5 दिनांक 14 /03 /2020 चे अनुषंगाने प्रादुर्भाव रोखण्याच्या तरतुदीनुसार उल्लंघन केले आहे. यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी संबंधित आरोपीच्या ताब्यातील माल-1,00000/-रुपये किमंतीचा टेम्पो नं. एम. एच. 14 ए. झेड. 787 त्यामध्ये आठ बेवारस मोकाट लहान मोठी कुत्रे ताब्यात घेण्यात आला आहे.

अकोले पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 218/2020 भारतीय दंड संहिता 188,269 प्रमाणे व प्राण्यास निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध 1960 चे कायदा कलम -3,11, (क) (ग) (घ) प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. यासंबंधी वाहन चालक अल्ताफ बाबा मिया शेख (वय-42, राहणार कुरण रोड, संगमनेर तालुका संगमनेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पांडे हे करीत आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत असल्यामुळे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. संबंधित कुत्र्यांना पकडून हद्दीच्या बाहेर नेऊन कुत्र्यांना सोडण्यात येणार होते. सदरचे कुत्रे जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संगमनेरकरानी या बद्दल नगरपालिकेचे आभार व्यक्त केले.

संगमनेर नगरपालिका हद्दीत पकडण्यात आलेले मोकाट कुत्री जंगलात सोडण्यासाठी ताब्यात घेण्यात आले होते. सदरचे कुत्रेे जंगलात सोडण्यासाठी संबंधित चालकाने अकोल्यातील कळस, कुंभेफळ, रेडे या परिसरात सोडले. त्यामुळे नागरिकांच्या मनात संतप्त भावना निर्माण झाला. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांनी पोलीस स्थानकात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अकोल्यातील गावी म्हणजे जंगल आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे घेऊन जाणार्‍या टेम्पोचा चालक संगमनेरातील कुरण रोडचा रहिवासी आहेत. सध्या संगमनेर शहर व परिसरात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात धास्ती आहे. त्यात चालक संगमनेरचा व कुरण रोडचा असल्यामुळे पकडून देण्यात आलेल्या नागरिकांच्या मनात त्यामुळे धास्ती निर्माण झाल्याचे चित्र होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या