आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड

jalgaon-digital
3 Min Read

अकोले | प्रतिनिधी

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप प्रकरणी आज तडजोड झाली आहे.

70 हजार कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती डॉ अजित नवले यांनी दिली .राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या बरोबर चर्चा केली व संप प्रकरणी तडजोड घडवून आणली.

आज झालेल्या समझोत्यानुसार आशाताईंना 1.7.2021पासून 1500 व गटप्रवर्तकांना 1700 रुपये दरमहा रुपये वाढ मिळणार आहे. त्यापैकी माहिती संकलन व सादरीकरण या कामी आशांना दरमहा 1000 व गटप्रवर्तकना 1200 रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ असून 500 रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहे. तसेच पुढील वर्षी 1.7.2022. पासून आशा व गटप्रवर्तकांना 500/ रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ मिळणार आहे .

या प्रकारे आशा सेविकांना 2000 व गटप्रवर्तकांना 2200 रुपये वाढ मिळण्याचा समझोता आज करण्यात आला. आशां व गटा प्रवर्तकांच्या कामकाजाबाबत व सेवाशर्ती बाबत अभ्यास करण्यासाठी यशदाची समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीवर आशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी असतील.

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका नगरपंचायतीने कोविड कामासाठी आशा व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शिफारस करण्यात येईल. व्हॅक्सिनेशन च्या मोहिमेमध्ये सोशल मोबिलाइजर व ग्राउंड मॅनेजमेंट या प्रकारची कामे करण्यासाठी 200 रुपये प्रति दिन भत्ता देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांसाठी आशा निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आशा यांचे मानधन व मोबदला यांचा तपशील त्यांना लेखी देण्यात येणार आहे. करोना बाधित होऊन मयत झालेल्या आशा यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये विमा मिळण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात येईल. आशा व त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येईल. एक एन एम व जीएनएम साठी प्रशिक्षण देऊन भरती करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. आशा व गटप्रवर्तकांवर वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल. संप केल्याबद्दल आशा व गटप्रवर्तक यांविरुद्ध कुठलीही कारवाई होणार नाही व वेतन किंवा मोबदल्यात कपात होणार नाही.वरील प्रमाणे मागण्याबाबत एकमत होऊन आज समझोता करण्यात आला.

महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, डॉक्टर डी एल कराड, राजू देसले, शुभा शमीम, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संघटना प्रतिनिधींचे व संघटना प्रतिनिधींनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले.

सिटूने संपाची ठाम भूमिका घेतली व राज्यभरातील आशा व गट प्रवाटकांनी सिटूला साथ दिली यामुळेच आपण काही प्रमाणात यशस्वी होऊ शकलो. एकजूट अशीच मजबूत ठेवली व सिटू मजबूत केली तर आगामी काळात आणखी मागण्या नक्कीच मान्य करून घेता येतील. संपात सहभागी होऊन लढा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन!

डॉ. अजित नवले राज्य सचिव, किसान सभा, महाराष्ट्र

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *