Thursday, April 25, 2024
Homeनगरदगडालाही पाझर फोडणारा हाडाचा शेतकरी

दगडालाही पाझर फोडणारा हाडाचा शेतकरी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले जीवन व्यतीत करत असताना आदिवासी पट्ट्यातील शेतकरी परिस्थितीशी झुंज देत काबाडकष्ट करत आपली शेती फुलवत आहे. डोंगर उताराची व कसन्या योग्य नसलेली जमीन मशनरी च्या साह्याने पिकाखाली आणून त्यावर अत्यंत मेहनतीने शेती फुलवत आहे. अकोले तालुक्यातील शिवाजीनगर येथील रंगनाथ गोडे या शेतकर्‍याने आपल्या वडिलोपार्जित एकूण 3-4 एकर क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला पिके घेऊन शेतकर्‍यांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे.

- Advertisement -

वर्षानुवर्ष रोजगाराच्या शोधात गाव सोडून जाताना, आपले कुटुंब सोडून जाताना जीवन जगणे अतिशय कठीण जात होते. रोजगारासाठी नाशिक, सिन्नर, कल्याण, नारायणगाव, मंचर याठिकाणी स्थलांतर करावे लागत असायचे. परंतु परिस्थितीशी झुंज देत डोंगर उताराची आणि कसन्यायोग्य नसलेली जमीन त्यांनी जेसीबी आणि इतर मशनरी च्या साह्याने लेव्हल करून पिकाखाली आणली. वडिलोपार्जित सुमारे 10 ते 15 एकर जमीन त्यांना होती त्यापैकी पाच एकर जमीन ही पाझर तलावात गेल्याने हातात उरली ती डोंगर उताराची जमीन ज्या जमिनीवर पिके घेणे तर दूर सरळ उभेही राहता येत नव्हते.

डोंगरउतारावर असलेली जमीन यापूर्वी कसन्या योग्य नसल्याने त्यावरती पिकांचे नियोजन करणे शक्य नव्हते. फार फार तर जनावरांना चारण्यासाठी येथे उपयोग होत असे. परंतु शिवाजीनगर येथे पाझर तलावाचे काम झाल्यानंतर पाण्याची वर्षभर सोय झाली. आणि त्या आधारे इथल्या अनेक गरीब शेतकर्‍यांनी वर्षानुवर्ष जपलेली भूमाता आता पिकाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज हा संपूर्ण परिसर विविध पिकांनी नटलेला आहे. गावामध्येच रोजगार निर्माण झालेला आहे.

रंगनाथ गोडे यांनी आपल्या शेतामध्ये विविध पिके यशस्वीपणे घेतलेले आहेत. यामध्ये टोमॅटो, वालवड, वांगी, गवार, मिरची ढोबळी, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा, भुईमूग, तूर, मूग, उडीद, भात, गहू, हरभरा, वाल अशी विविध पिके ते आता सहज घेऊ शकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढलेल्या रंगनाथ गोडे यांना यंदा पीकपाण्याने चांगली साथ दिलेली आहे.पूर्वीचे दिवस आठवले नंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि सहन केलेल्या हाल-अपेष्टा व झालेल्या त्रास याबद्दल ते बोलते झाले. मुलं बाळ सोडून दुसर्‍याच्या शेतात राबणे व पोटाची खळगी भरणे वाटते तितके सोपे नाही हे कुणाच्याही नशिबात येऊ नये यासाठी सरकारने काम करावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. पाण्याची व्यवस्था झाल्यास शेतकरी स्वकष्टाने शेत फुलू शकतो त्याला कुठलेही अडचणींना सामोरे जाण्याचे माहिती असते. गरज आहे ती जागोजागी पाणी अडवून जमिनी पिकाखाली आणण्याची.

- Advertisment -

ताज्या बातम्या