Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोले एज्युकेशन सोसायटी निवडीत यापूर्वी कधी दोष दिसले नाहीत का?

अकोले एज्युकेशन सोसायटी निवडीत यापूर्वी कधी दोष दिसले नाहीत का?

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळात नुकतेच फेरबदल केले, आता हे जे बदल झालेत ही पहिली वेळ नसून अनेक वेळा कमिटीत काही बदल होत असतात, परंतु यामागे निवडीत दोष कुणाला दिसले नाही आणि आता जसे अफगाणिस्तानातून लोक आणून कमिटी स्थापन केल्यागत काही सूज्ञ मंडळी थयथयाट करत आहेत असा टोला अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी संस्था बचाव कृती समितीच्या नावाने सुरू असणार्‍या आंदोलनातील काही राजकीय नेते मंडळींना लगावला आहे.

- Advertisement -

श्री. वाकचौरे यानी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, हेरंब कुलकर्णी यांचे आणि जे. डी. आंबरे पाटील यांचे नाव समोर करून काही लोक राजकारण करतायेत. पण यावेळी कुलकर्णी आणि आंबरे पाटील कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत नाही. फक्त द्वेषापोटी भडकावू भाषेचा वापर करून संस्थांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम काही मंडळींनी तालुक्यात सुरू केलेला आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखाना आणि अकोले एज्युकेशन सोसायटी ह्या तालुक्यातील प्रमुख संस्था आहेत, यामध्ये पूर्वी केव्हाही राजकारण झालं नाही, किंबहुना सदस्य कोण आहेत हे जनतेला माहीत पण झालं नाही. त्याठिकाणी संस्थेची भरभराटी कशी होईल याबाबत कार्य झालं आणि म्हणूनच आज संस्था सदन झालेली बघायला मिळतेय. सहकार आणि सेवाभावी संस्थेत काम करत करताना पिचड यांनी कायमच उन्नतीचा विचार केलेला आहे.

एज्युकेशन संस्था कालकथीत. दादासाहेब रुपवते, कै. भाऊसाहेब हांडे, कै. यशवंतराव भांगरे, कै. लालचंदजी शहा, कै. बुवासाहेब नवले, कै. बा. ह. नाईकवाडी यांच्या पुढाकारातून उभी राहिली यात दुमत नाही परंतु मधुकरराव पिचड आमदार तथा मंत्री असताना संस्थेसाठी इमारती, अनुदान, नवनवीन कोर्सेस आणि इतर शाखा सुरू करणे याबाबत अतिशय मोठं काम केलं, यावेळी अनेक मान्यवरांचं सहकार्य त्यांना लाभलं.

आमदार यांचे पिताश्री यमाजी लहामटे गुरुजी यांना सोबत घेऊन विविध पदांवर बसविण्याचे काम माजी मंत्री पिचड यांनी केले व आज खुद्द आमदार म्हणतायत की पिचडांनी आजपर्यंत फक्त बरबटलेल्या लोकांना पदे दिली.

विरोध हा तात्विक असावा आणि त्याबाबत लढाही योग्य मार्गाने असावा, व्यक्तिद्वेष ठेवून विरोध केल्यास तालुक्यातील संस्थांचे अतिशय मोठे नुकसान होईल आणि यात ज्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे त्यांनाही संकटाला सामोरं जावं लागेल याचा विचार होणं आवश्यक आहे. एज्युकेशन संस्थेत विविध संघटनेतील लोकांना सोबत घेऊन चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न पिचड यांनी केलेला आहे. तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिकांची मानसिकता बघता आता ह्या द्वेषात्मक आंदोलनांना आणि चुकीच्या वक्तव्यांना तालुक्यातील जनता नक्कीच पाठिंबा देत नाही.असेही रावसाहेब पाटील वाकचौरे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या