Friday, April 26, 2024
Homeनगरवर्ग खोल्यांअभावी झाडाखाली मातीत भरते आकोल्याची शाळा

वर्ग खोल्यांअभावी झाडाखाली मातीत भरते आकोल्याची शाळा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील अकोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण घ्यावे लागत आहे. याबाबत पालक, ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समीती, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. वर्ग खोल्यांची सोय करा अन्यथा शाळा बंद ठेवा,अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान गुरूवारी तातडीने गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी अभय वाव्हळ यांनी आकोला शाळेला भेट देऊन चौकशी करून सविस्तर अहवाल तयार केला आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांना सादर केला जाणार असून काय कारवाई होते याकडे अकोला ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.तालुक्यातील अकोला येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी आठ शिक्षक कार्यरत असून एक पद रिक्त आहे. शाळेची कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता पुर्वीची इमारत जुनी झाल्याने निर्लेखन करून दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समितीमधून 2017 -18 या आर्थीक वर्षात एक, 2018- 19 मध्ये एक, 2019-20 मध्ये दोन व सन 2021 मध्ये एक अशा एकूण पाच वर्गखोल्या मंजूर आहेत. बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी प्रत्येक वर्गखोलीसाठी एक वर्षाचा आहे. संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेले असून कामे सुरू आहेत. मात्र, अद्याप एकाही वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने स्थानिक विद्यालयाकडे मागणी करून वर्गखोल्यांची काही दिवस तात्पुरत्या स्वरूपात सोय केली.

मात्र, स्थानिक विद्यालयांच्या दहावी व बारावीच्या परीक्षा यावर्षी शाळेतच होणार असल्याने त्यांना त्यांच्या वर्गखोल्यांची गरज आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी वर्गखोल्याच उपलब्ध नसल्याने शाळेच्या आवारातच झाडाखाली शाळेचे वर्ग भरवून जमिनीवर मातीत बसवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.

सोमवारी होणार पाहणी

याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व पालकांनी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की वर्गखोल्या बांधकामाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील सामाजिक सभागृह, मंदिर किंवा छताखाली बसण्याची सोय ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने करावी. उघड्यावर शाळा भरू नये, अशी सुचना त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या