पाहुणे लोक गेल्यानंतर काय बोलायचे ते बोलेन

jalgaon-digital
4 Min Read

पुणे(प्रतिनिधि)

“पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन . मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरुच आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असे देखील ते म्हणाले. अजित पवार आज कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, आयकर विभागाचे पाहुणे आलेत ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन मी पळून चाललेलो नाही. त्यांच्या चौकशीत अडथळा निर्माण होईल, असे मी काही करणार नाही. मी कधीही नियमबाह्य वागत नाही. प्रत्येकाने सरकारचे कर वेळेत भरावेत असा माझा नेहमी आग्रह असतो. माझ्याशी संबंधित सर्व सहकारी तसेच खासगी संस्थांना अर्थिक शिस्त लावण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे उपस्थित करण्यात येत असलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मी देणार आहे. जरंडेश्‍वरचा मालक कोण याचेही उत्तर मी देणार आहे.’’

“आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचं काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? कॅश सापडतात का ? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करुन ते जातील. मग मी यावर भाष्य करेल,” असे अजित पवार म्हणाले.

सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी

सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. सोमवारपासून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरु करणार आहोत. तसंच सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित ट्रेनिंग सेंटर सुरु करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

पुण्यात अजितदादांच्या समर्थनात कार्यकर्ते रस्त्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पुण्यातील विधान भावनासमोर मानवी साखळी तयार करून जोरदार घोषणाबाजी केली.

अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. हिमालयापुढे सह्याद्री कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही. अजित पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे. जनताच आता भाजपला प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते विधान भवनासमोर आक्रमक झाले होते. त्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार विधान भवनाबाहेर आले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *