Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअजितदादांचा संताप अन् हरिभाऊ बागडेंचा रिपोर्ट पाच मिनिटांत !

अजितदादांचा संताप अन् हरिभाऊ बागडेंचा रिपोर्ट पाच मिनिटांत !

रवींद्र पाटील – जळगाव :

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजता विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे विधिमंडळाच्या परिसरात पोहोचले. यावेळी त्याआधी आलेले अनेक पक्षांचे आमदारदेखील याच ठिकाणी थांबून होते. मात्र,…

- Advertisement -

कोरोना चाचणी झाल्याशिवाय व त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय या आमदारांना विधान भवनात सोडण्यात येत नव्हते. या ठिकाणी रिपोर्ट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधान भवन परिसरात हजर झाले. सुरु असलेला गोंधळ पाहून तेदेखील चकित झाले. याचवेळी हरिभाऊ बागडे यांनी दादांकडे या सार्‍या गोंधळाची तक्रार करीत आमदारांनी सभागृहात कसे पोहोचावे, याबाबत विचारणा केली. हरिभाऊंची तक्रार एकताच दादांचा पारा चढला. याठिकाणी असलेल्या अधिकार्‍यांची एकच धावपळ सुरु झाली. ‘असे कसे चालेल? याठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध असताना आमदारांची चाचणी का घेण्यात येत नाही? सचिवांना बाहेर बोलवा’ असा दादांनी आदेश देताच अजूनच धावपळ वाढली.

त्यानंतर अनेक आमदारांनी दादांना मतदारसंघातून तपासणी करून निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणल्याचे दाखविले. त्यावर दादांचा संताप अधिकच वाढला.

‘हा काय प्रकार आहे, ज्यांनी मतदारसंघातून चाचणी करुन आणली त्यांचे रिपोर्ट जमा करून त्यांना आत सोडा’ असे दादांनी सांगताच या ठिकाणी व्यवस्थेत असलेल्या अधिकार्‍यांचा अधिकच पोपट झाला.

त्यानंतर या आमदारांना आत सोडण्यास सुरुवात झाली.हा विषय मार्गी लागताच दादांनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे आपला मोर्चा वळविला. ‘याच ठिकाणी चाचण्यांची व्यवस्था आहे ना, हरिभाऊंची चाचणी घ्या’; असे सांगताच गेटवरच हरिभाऊंची चाचणी घेण्यात आली अन् पाचच मिनिटांत हरिभाऊंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

त्यानंतर त्यांच्यासोबत अजितदादा विधान भवनात चालते झाले. मात्र, सरकारचा हा सारा गोंधळ वृत्तवाहिन्यांवरून सार्‍या महाराष्ट्राने पाहिला. सरकारच असे गोंधळलेले असेल तर राज्यातील जनतेने काय करावे? अशी चर्चा त्यानंतर दिवसभर सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या