Wednesday, May 8, 2024
Homeनगरस्वकर्तृत्व मावळलं...

स्वकर्तृत्व मावळलं…

संदीप रोडे

कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसताना अन् अल्पसंख्याक जैन समाजातून उदयास आलेले नेतृत्व स्वकृर्तृत्वाने बहरले. तीनदा खासदार अन् केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारूनही दिलीप गांधींच्या डोक्यात मोठेपणाची हवा कधी घुसली नाही. खासदारकीच्या तिकिटाचा दोनदा पत्ता कट झाल्यानंतरही पक्षावरची त्यांची निष्ठा तसूभरही आटली नाही. ज्यूस विक्रेता ते केंद्रीय मंत्री या यशस्वी प्रवासातून उभा राहिलेला ‘लोकनेता’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. सामान्यांशी जुळलेली नाळ शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. हक्काचा माणूस, रात्री अपरात्री कधीही भेट, फोनवरही मदत करणारा दिलीप गांधींसारखा ‘लोकनेता’ नगरमध्ये पुन्हा होणे नाही!

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील रस्तापूर हे दिलीप गांधी यांचे मूळ गाव. नातलगांचा गोतावळा नगरमध्ये असल्याने व्यवसायानिमित्त गांधी परिवार रस्तापूर सोडून नगरला आले. वडील ट्रक ड्रायव्हरकी करत. अल्पसंख्यांक जैन समाजातील दिलीप गांधी यांनी सुरूवातीला आशा टॉकीज चौकात समर्थ हॉटेल भाडोत्री घेतले. पुढे स्वत:चे देवेंद्र हॉटेल सुरू केले. ज्यूस गाडी चालवित असताना तत्कालीन अध्यक्ष गुलशन जग्गी, युवा मोर्चाचे अध्यक्ष दामोधर बठेजा यांनी त्यांना भाजपचे सक्रिय सभासदत्व दिले. त्यानंतर गांधी यांनी पदरमोड करत भाजपचे संघटन वाढविले. स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांच्याशी दिलीप गांधी यांची जवळीक निर्माण झाली. हे नेते नगरला आले की ‘देवेंद्र’ला जेवण ठरलेले असायचे. रस्त्यात कधीही बंद पडणारी मोटारसायकल अन् त्यात उसनवारीने पेट्रोल टाकून त्यांनी खस्ता खात भाजपवाढीसाठी जीवाचे रान केले. शाखा स्थापन करत लोकं जोडली. हीच जोडलेली लोक त्यांना पुढे दिल्लीला घेऊन जाण्यास कामी आली.

भाजपवाढीसाठी सतत भ्रमंती करणारे दिलीप गांधी यांनी व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. सतत नाविन्यपूण, काहीतरी वेगळे करण्याचा त्यांना ध्यास असायचा. नगरमधील पहिली थाळी सिस्टीम ‘देवेंद्र’ला, केटरींग अन् त्यानंतर गृह सजावट साहित्य विक्रीचे दालन त्यांच्या कल्पनेतून प्रथमच सुरू झाले होते. यातून त्यांची धडपड दिसून येते.

पक्षाचे कार्य धडाडीने करणार्‍या दिलीप गांधी यांनी कापडबाजार परिसरातून भाजपने नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देऊ केली. माजी नगराध्यक्ष नवनीत बार्शीकर यांचा पराभव करत गांधी यांचा राजकीय श्रीगणेशा झाला. पक्षातील वरिष्ठांसोबतच उठबस आणि त्यांच्याशी असलेले संबंधामुळे गांधींना ‘दिल्ली’ची आस लागली होती. भाजपच्या तत्कालीन स्थानिक नेत्यांनी स्व. सुवालाल गुंदेचा यांना गळ घालून दिलीप गांधी यांना अर्बन बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिले. पक्षाचे सरचिटणीस, शहराध्यक्ष आणि बँक कारभाराच्या जोरावर दिलीप गांधी यांना 1999 ला भाजपकडून लोकसभेचे तिकिट मिळाले.

खस्ता खाऊन, आर्थिक झळ सोसत वाढविलेल्या पक्षाची साथ आणि जनसामान्यांतील वावर यामुळे गांधी यांनी खासदारकीच्या विजयाचा तीनदा गुलाल घेतला.

मंत्रीपद असतानाही 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गांधी यांचा पत्ता कट करत प्रा. ना. स. फरांदे यांना उमेदवारी देऊ केली. पण गांधी नाराज झाले नाहीत. ते फरांदे यांच्या प्रचारात सक्रिय होत पक्षाशी

एकनिष्ठ राहिले. दुर्देवाने फरांदे यांचा पराभव झाला. भाजपची जागा कमी झाली. पुढच्या टर्मला 2009 मध्ये भाजपने पुन्हा दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली. त्यांनी पुन्हा ही जागा मिळवत दिल्ली दरबारी धडक मारली. 2014 च्या निवडणुकीत विजयश्री मिळवित खासदारकीची तिसरी टर्म यशस्वीपणे पूर्ण केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाने दिलीप गांधी यांना थांबावे लागले. पण म्हणून मग ते नाराज झाले अन् पक्षापासून दुरावले असं झालं नाही. राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्यानंतर सुरुवातीला अलिप्त राहिलेले गांधी हे विखेंच्याही प्रचारात पुन्हा जोमाने सक्रिय झाले. जवळपास दोन वर्षे पक्षात असूनही पदाविना असलेले दिलीप गांधी यांचे पुनर्वसन झालेच नाही. याच काळात त्यांना कोरोनाने गाठले अन् त्यातच त्यांची एक्झिट झाली. अशा या लोकनेत्यास नगर टाइम्स परिवाराची अदरांजली!

- Advertisment -

ताज्या बातम्या