Thursday, April 25, 2024
Homeनगरअहमदनगर : तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटर पुन्हा होणार सुरू

अहमदनगर : तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटर पुन्हा होणार सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) –

करोना संपविण्याासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. घराबाहेर पडताना चेहर्‍यास मास्क

- Advertisement -

बांधावा. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. विशेषता शहरी भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासन घेत असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व आवश्यक तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व तहसीलदारांना तसेच महानगरपालिका यंत्रणेला दिल्या आहेत. करोना रुग्णांच्या निकट संपर्कातील नागरिकांच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. लांघी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींची उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या पूर्वकाळजीविषयक सूचना आणि प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन काही जणांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे करोना रुग्णाच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहर्‍यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून आता दंडाची रक्कमही पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे. याशिवाय, शासकीय कार्यालयात आता मास्क नाही-प्रवेश नाही, याची कार्यवाही केली जाणार आहे. त्याचबरोबर मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्यासाठीची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यांनी त्यांच्या क्षेत्रात कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व तयारी दोन दिवसात पूर्ण करावेत. एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव आला तर त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, अशा सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या. कोविड केअर सेंटरप्रमाणेच कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठीची सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे ते म्हणाले.

…………………

221 नवे रुग्ण, तीन मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी नव्याने 221 करोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 1 हजार 250 इतकी झाली आहे. यात जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 136, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 66 आणि अँटीजेन चाचणीत 19 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 56, अकोले 9, जामखेड 2, कर्जत 17, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 5, नेवासा 2, पारनेर 3, राहुरी 2, संगमनेर 15, शेवगाव 8, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 02, कॅन्टोन्मेंट 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 21, अकोले 3, नगर ग्रामीण 7, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 2, राहाता 15, राहुरी 2, संगमनेर 7, शेवगाव 1, श्रीरामपूर 2 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 19 जण बाधित आढळुन आले. मनपा 2, कर्जत 1, नगर ग्रामीण 1, नेवासा 1, पारनेर 1, पाथर्डी 4, राहाता 5, शेवगाव 3 आणि श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. यासह कालच्या मृतांच्या 1 हजाार 144 च्या आकडेवारीत तीनची वाढ झाली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 147 झाली आहे.

…………….

- Advertisment -

ताज्या बातम्या