Wednesday, April 24, 2024
Homeनगरभाजपमधील विखे विरोधकांची गोपनीय बैठक

भाजपमधील विखे विरोधकांची गोपनीय बैठक

माजी मंत्री राम शिंदे यांचा पुढाकार?

जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत चर्चा

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीपासून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी आज त्यांना टाळून बैठक घेतली. या बैठकीचे नियोजन माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केल्याचे समजते.

जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस स्वतः शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. चंद्रशेखर कदम सायंकाळपर्यंत उपस्थित झालेले होते. विधानसभेत पराभूत झालेले सर्व उमेदवार एकत्र आले असले, तरी आ. राजळे आणि आ. पाचपुते मात्र बैठकीस नव्हते. हे दोघेही बैठकीस उशीरा येणार असल्याचे एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 ला जिल्ह्यात सक्षम नेतृत्त्व नसतानाही पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे सक्षम नेतृत्त्व असताना हा आकडा तीनवर आला. विशेष म्हणजे पराभूत झालेल्या माजी मंत्री राम शिंदे यांच्यापासून आ. कर्डिले, आ. पिचड, आ. मुरकुटे यांनी आपल्या पराभवास विखे हेच जबाबदार असल्याच्या तक्रारी केल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या.

या नेत्यांपैकी काहींनी खासगीतही यास दुजोरा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
बैठकीत संघटनात्मक निवडी, आगामी निवडणुका अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या बैठकीसाठी विखे पिता-पुत्रांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या बैठकीचा तोच अजेंडा असल्याचे खात्रीलायक समजते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील या सध्या अध्यक्षा आहेत. भाजपकडून त्याच पुन्हा उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र विखे विरोधातील सर्व भाजप नेत्यांच्या या बैठकीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हा योगायोग की अन्य काही
विखे पाटील यांचे परंपरागत राजकीय विरोधक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात शुक्रवारी नगरमध्ये होते. नेमक्या त्याच दिवशी भाजपमधील नाराज नेत्यांची ही बैठक होत असल्याने हा योगायोग की यामागे अन्य काही आहे, अशीही चर्चा यामुळे सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या