53 नागरिकांनी केले अवयवदानाचे संकल्प

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अवयवदान चळवळीचा जागर करीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. देशात अनेक नागरिक विविध अवयवांच्या प्रतिक्षेत असताना त्यांना नवीन जीवदान देण्यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरदेवळे (ता. नगर) येथे अवयवदान सप्ताहतंर्गत झालेल्या कार्यक्रमात 53 नागरिकांचे अवयवदान संकल्पाचे अर्ज भरुन घेण्यात आले असल्याची माहिती फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.

दरवर्षी 13 ते 19 ऑगस्ट अवयवदान सप्ताह राबविण्यात येतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली नागरदेवळे येथे शनिवार दि.15 ऑगस्ट रोजी अवयवदान जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.

जालिंदर बोरुडे यांनी देशात मोठ्या संख्येने नागरिक अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. शरीर हे नष्वर असून मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवाने इतरांना जीवदान मिळत असेल तर यासारखे पुण्य कमविण्याचे भाग्य दुसरे नाही. एका व्यक्तीने योग्य वेळेत मरणोत्तर देहदान केल्यास त्याच्या विविध अवयवाच्या माध्यमातून 7 व्यक्तींना जीवदान मिळू शकतो.

अंधश्रध्देमुळे अनेक नागरिक देहदान करण्यास पुढे येत नसून, विविध माध्यमांद्वारे समाजात जागृती करण्याची गरज आहे. या भावनेने फिनिक्स फाऊंडेशन मागील वीस वर्षापासून अवयवदान चळवळीत योगदान देत आहे.

फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने 17 ते 18 व्यक्तींचे मरणोत्तर अवयवदान झाले आहे. या अवयवदानातून 48 नागरिकांना नवजीवन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. आपण जग सोडून जाताना इतर गरजू व्यक्तींना अवयव उपलब्ध करुन देण्याचे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *