Friday, April 26, 2024
Homeनगरनगर बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त

नगर बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त करत समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी बुधवारी (दि.2) याबाबत आदेश काढले असून प्रशासक म्हणून तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांची नियुक्ती केली आहे. प्रशासक रत्नाळे यांनी तातडीने बाजार समितीत जाऊन प्रशासक पदाचा पदभारही घेतला आहे.

- Advertisement -

नगर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक मंडळाची पहिली सभा 3 डिसेंबर 2016 रोजी होऊन सभापती, उपसभापती यांची निवड करण्यात आली होती. या संचालक मंडळाची मुदत 2 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आली आहे. राज्य शासनाने करोना प्रादूर्भाव तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सेवा सोसायट्यांच्या निवडणुका झाल्याशिवाय बाजार समित्यांच्या निवडणुका घेऊ नयेत, असे आदेश दिल्याने बाजार समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळाला 3 महिने मुदतवाढ दिली होती.

याबाबतचा आदेश 21 जानेवारी 2022 रोजी काढला होता. मात्र, या आदेशात ज्यांच्या विरुद्ध प्रत्यक्षात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे, अशी संचालक मंडळे वगळून इतर संचालक मंडळांना मुदतवाढ देण्यात येत आहे, असे आदेशित केलेले होते. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी नगर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शासनाच्या आदेशानुसार ज्यांच्याविरुद्ध प्रत्यक्षात चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशा संचालक मंडळास मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे नगर बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या