Monday, April 29, 2024
Homeनगरनगर-कोपरगाव महामार्ग पावसाळ्यात प्रवाशांचा अंत पाहणार!

नगर-कोपरगाव महामार्ग पावसाळ्यात प्रवाशांचा अंत पाहणार!

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

गेल्या अनेक वर्षापासून हजारो प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला व अखंडपणे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असलेला मात्र कधीच काम पूर्णत्वास न गेलेल्या नगर-कोपरगाव रस्त्याचे टेंडर होऊन जवळपास चार महिने उलटून गेले मात्र अद्यापही वर्क ऑर्डर न झाल्याने या रस्त्याचे काम या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी शक्यता वाटत नाही.खोदलेल्या साईट पट्ट्या अर्धवट ठिगळे दिलेला खड्डेमय रस्ता येत्या पावसाळ्यातही प्रवाशांचा अंत पाहणार असेच चित्र दिसत आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प त्यानंतर खासगी ठेकेदार त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असा चार विभागांमधून फिरलेला, मात्र कधीच चांगल्या दर्जाचे काम न झाल्यामुळे नगर-कोपरगाव रस्ता प्रवाशांसाठी कायमच मृत्यूचा सापळा बनलेला आहे.जागतिक बँक प्रकल्प व खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम यापूर्वी करण्यात आले. त्यावर टोलही बसवण्यात आला. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे न्यायालयाने ही टोल वसुली बंद केली. वसुली बंद झाल्यामुळे या कंत्राटदाराने अर्धवट काम सोडून पळ काढला.

दरम्यानच्या काळात राज्य सरकारने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला. तात्पुरती मलमपट्टी व काम करणारे ठरविक कंत्राटदार यामुळे या रस्त्याचे पुरते वाटोळे झाले.त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. या विभागाकडून रस्त्याची काम देण्यात आले मात्र साईड पट्ट्या खोदून व बर्‍याच ठिकाणी एक बाजूचा रस्ता खोदून ठेवून काम अर्धवट सोडून हा दुसराही कंत्राटदार पळून गेला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून यामुळे रस्त्यावर प्रचंड अपघात घडत आहेत.

अनेकांना यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने बर्‍याच ठिकाणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती तुटपुंजी ठरणार आहे. खोदलेल्या साईडपट्ट्या व पडलेले खड्डे यामुळे अनेक अपघातांना नव्याने निमंत्रण मिळणार आहे. विभागाने गेल्या वर्षी या कामासाठी सुधारित जवळपास पावणे सातशे कोटीचे टेंडर काढले होते. रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीने हे टेंडर 38 टक्के बिलोने 418 कोटींना घेतले आहे.

साधारणतः 75 कि. मी. अंतराचे काम त्यात डांबरीकरण, काही काँक्रिटचे पॅचेस सिंमेट बांधकामे भराव ह्या सर्व बाबी वाढत्या भाववाढीमुळे गुणवत्तापूर्ण होतील का याबाबत जाणकारांमध्ये शंका आहे. असे असले तरी गेल्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला या कामाची निविदा अंतिम करण्यात आली होती. या प्रक्रियेला जवळपास चार महिने उलटून गेलेले आहेत.अद्यापही विभागाने संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली नसल्याने रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. पुढील जून महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम शक्यतो बंदच असतात.त्यामुळे चालू पावसाळा प्रवाशांना जीव धोक्यात घालूनच काढावा लागणार असेच चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या