अहमदनगर : आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या मार्गावर

अहमदनगर (प्रतिनिधी) –

वाढत्या करोना बाधित रुग्णांमुळे नगर शहरासह जिल्ह्यात सगळीकडे शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये देखील आरोग्य सुविधा

अपुर्‍या पडू लागल्या आहेत. रोजची विक्रमी रुग्ण संख्या आणि उपलब्ध बेडची संख्या याचे गणित जुळेनासे झाले आहे. उपयुक्त औषधांचा साठा तसेच गंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे.

विशेषतः नगर जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे बेड उपलब्ध करणे अवघड झाले आहे. अक्षरशः रुग्णालयातील बाकांवर रुग्णांना झोपवून त्या ठिकाणी उपचार दिले जात आहेत. आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत असली तरी देखील रुग्णांची संख्या त्याहून कैक पटीने जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते.

एकीकडे रुग्ण संख्येत भरमसाठ वाढ आणि उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची धडपड, अशी वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने करोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करूनही नियमांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होताना दिसते आहे.

नागरिकांच्या दृष्टीने हा लॉकडाऊन आहे किंवा नाही, काय सुरु काय बंद, याबाबत संभ्रम आहे. याशिवाय गांभीर्याने नियमांचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यातच पोलीस महासंचालकांनी पोलिसांनी सर्रास लाठीचा वापर करू नये, असे निर्देश दिल्याने नियम मोडणार्‍यांना सवलत मिळाल्याचे वातावरण आहे. नागरिकांनी आपली लढाई प्रशासनाशी नसून करोनाशी आहे, हे लक्षात घेऊन करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *