Saturday, May 11, 2024
Homeनगरजिल्हा रुग्णालय अग्नितांडव : हलगर्जीपणाचा ठपका

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव : हलगर्जीपणाचा ठपका

अहमदनगर | Ahmedagar

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने 60 पेक्षा जास्त पानांचा अहवाल तयार केला असून तो सोमवारी राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरुवारी रात्री नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून अहवाल सादर केल्यानंतर सरकार यावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागून 11 रूग्णांचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान जखमी सहापैकी तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या 14 झाली आहे.

सरकारने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणासह सहाजणांवर कारवाई केली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने घटनास्थळी भेट देवून नोंदी घेतल्या. जिल्हा रूग्णालयाशी संबंधित विविध विभागांना प्रश्नावली दिली होती, ती भरून घेत त्यावर विश्लेषण केले होते.

गुरुवारी आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची शेवटची बैठक झाली. आगीचा घटनाक्रम, आग कशामुळे लागली त्याचे कारण, आग लागल्यानंतर केलेला हलगर्जीपणा, अतिदक्षता विभागाच्या कामातील त्रुटी, भविष्य अशा घटना घडू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करून 60 पानी अहवाल सरकारला सादर करणार आहे.

तक्रारींची दखल

जिल्हा रूग्णालयासंदर्भात यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल चौकशी समितीने घेतली असून अहवालामध्ये त्याचा विचार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयातील एक्सप्रेस फिडरमधून खासगी रुग्णालयाला दिलेल्या वीज कनेक्शनचीदेखील चौकशी समितीने या अहवालात दखल घेतली आहे. सरकार याप्रकरणी काय भूमिका घेणार, याची उत्सुकता लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या