Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी उद्या होणार प्रसिध्द

जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी उद्या होणार प्रसिध्द

अहमदनगर (प्रतिनिधी) –

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांनी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रीया ज्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या त्या टप्प्यापासून

- Advertisement -

4 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी उद्या (7 जानेवारी) अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या दहा दिवसांत जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी डॉ. ज्योती लाठकर यांनी काढले आहेत.

गतवर्षी 6 मार्च 2020 रोजी जिल्हा सहकारी बँकेची प्रारुप मतदार यादी करण्यात येवून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यावेळी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर 16 मार्च 2020 पावेतो प्राप्त हरकती, आक्षेप, दाव्यावर 20 मार्च 2020 ला सुनावणी घेण्यात येवून प्राप्त आक्षेपावर 23 मार्च 2020 रोजी अंतिम निर्णय देण्यात आलेले आहेत. दरम्यान, राज्यात कोविड-19 प्रादुर्भावामुळे शासनाने 18 मार्च 2020 ला सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नसल्याने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार ज्याप्रकरणी उच्च, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहेत, अशा सहकारी संस्था वगळून अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर तीन महिन्यांपर्यंत वेळोवेळी स्थगित केलेल्या होत्या. टप्प्याने ही स्थगिती 31 डिसेंबर 2020 पर्यंत होती.

आता कोविडचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांनी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रीया ज्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या त्या टप्प्यापासून 4 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानूसार नगर जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यात आज बँकेची प्रारूप मतदार यादी आज अंतिम करण्यात येणार असून त्यानंतर पुढील दहा दिवसात बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

…………..

प्रारूप यादीत 3 हजार 851 सभासद

जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीत 21 संचालकांच्या जागेसाठी संस्था सभासद आणि व्यक्ती सभासदांची संख्या 3 हजार 851 आहे. ही सभासद यादी आज अंतिम करण्यात येणार आहे. बँकेच्या 21 संचालकांच्या जागेत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून 14 संचालक, बिगर शेती सहकारी संस्थेतून आणि शेती पूरक सहकारी संस्थेतून प्रत्येकी एक आणि पाच राखीव मतदारसंघातून पाच संचालक आहेत.

………………….

निवडणुकीसाठी 7 लाख 37 हजारांचा खर्च

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाला प्रती सभासद 185 रुपये खर्च किमान खर्च आहे. 3 हजार 851 सभासदांचा 7 लाख 12 हजार आणि प्राधिकरण पातळीवरील 25 हजार असा 7 लाख 37 हजार खर्चाची रक्कम बँकेने प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

…………………

- Advertisment -

ताज्या बातम्या