Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापालिकेच्या ‘वर्क फ्रॉम होम’ला मुदतवाढ

महापालिकेच्या ‘वर्क फ्रॉम होम’ला मुदतवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होम कामकाजाला आणखी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेचे कामकाज सुरू राहणार असून बाकीचे कर्मचारी घरातूनच कामकाज करणार आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे, प्रशासन व कामगार युनियनमधील चर्चेत मंगळवारी (दि. 18) हा तोडगा काढण्यात आला. सोमवारी (दि. 24) त्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

करोनाने महापालिका कर्मचार्‍यांना बाधित केल्यानंतर युनियने काम बंद सुरू केले. त्यानंतर आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून बाकीच्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. सोमवारी त्यावर काहीच निर्णय झाला नाही.

मंगळवारी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये युनियनचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी आणि महापौर वाकळे यांची बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त प्रदीप पठारे, युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, प्रशासनाधिकारी मेहेर, लहारे, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, पुष्कर कुलकर्णी, शशी देवकर उपस्थित होते.

करोनाकाळात कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणी अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी मांडल्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती फार्मासिस्ट कर्मचार्‍यांना विश्रांती देऊन दुसर्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. याशिवाय ज्यांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा कर्मचार्‍यांना कोव्हिड सेंटरवर काम दिले जाणार नाही.

ज्यांना आजार आहे, पण त्यांची ड्युटी करोना केंद्रात लागली त्यांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखल करावे. तसेच महापालिकेच्या कर्मचार्‍यांची करोना टेस्ट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ज्या कर्मचार्‍यांना लक्षणे असतील त्यांनी महापालिकेच्या तपासणी केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आदेश महापौर वाकळे यांनी दिले.

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर येतील. इतर विभागांना आवश्यकता वाटल्यास कार्यालयात यावे. जे वर्क फ्रॉम होम करतील त्यांनी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन मोबाईल कायमस्वरूपी सुरू ठेवावेत, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रभारी अधिकारी-सहाय्यक आयुक्तांना जबाबदारी

महापालिकेच्या दोघा कर्मचार्‍यांचा करोनाने बळी घेतला असून अनेकांना बाधित केले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी धास्तावले आहेत. कर्मचारी युनियनच्या रेट्यामुळे कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्यास मुभा देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा एकदा बैठक होईल, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष लोखंडे यांनी दिली. प्रभाग समिती कार्यालयातील प्रमुख आणि महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील कामासाठी सहाय्यक आयुक्त एस.बी.तडवी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या