ऐतिहासिक होळकर पुलाची सुरक्षा आता ‘तंत्रज्ञानाच्या हाती’

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

120 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आणि अद्यापही कार्यरत असलेल्या अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरीया) पुलाच्या सुरक्षेचा विचार करता, नाशिक स्मार्ट सिटी कंंपनी अंतर्गत स्मार्ट ब्रीज सर्वायलन्स सिस्टीम हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सायरनही वाजत धोक्याची सूचना नागरिकांना तात्काळ मिळणार आहे…

नाशिक शहरातील युवक अरविंद जाधव व त्यांचे सहकारी यांनी तयार केलेल्या स्मार्ट ब्रीज सर्वायलन्स सिस्टीम पायलट प्रकल्प हा शहरातील होळकर पुलाकरिता पायलट प्रकल्प म्हणुन राबविला जात आहे. याकरिता होळकर पुलाखाली संवेदक (सेन्सर्स) बसविण्यात आले आहेत.

त्यामुळे कंपनांचे मापन होऊन त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात तात्काळ समजणार आहे. त्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये येथे लावण्यात आलेले सायरनही वाजणार असून धोक्याची सूचना नागरिकांना तात्काळ समजणार असून यामुळे संभाव्य दुर्घटना टाळता येणे शक्य होणार आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर जाधव याने या संकल्पनेवर काम सुरू केले आणि आता त्याचा पायलट प्रकल्पाची सुरूवात जानेवारी 2020 मध्ये होऊन आता प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

महाड पूल दुर्घटनेनंनतर पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि स्ट्रक्चरल ऑडिट या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. अशा दुर्घटना टाळता येणे किंवा त्याबाबत पुर्वसूचना मिळणे शक्य आहे का? या संदर्भात अरवींद जाधव आणि त्याच्या सहकार्यांनी हे संवेदक बनविले. आणि खर्‍या अर्थाने जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आलेले काम पूर्ण झाले आहे.

स्मार्ट सिटीच्या कौशल्य विकास प्रकल्पाचा मुळ हेतु हा नावीन्यपूर्ण प्रकल्पांना चालना देणे व त्याव्दारे युवकांना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे व त्यायोगे जनउपयोगी कामे होणे हा आहे व हाच मुळ हेतु साध्य होण्यास अशा पायलट प्रकल्पांमुळे मदत होत आहे.

हा पायलट प्रकल्प व त्याव्दारे उपलब्ध होणार्‍या माहितीचा पुढील दोन ते तीन महिने आढावा घेण्यात येणार आहे. तद्नंतर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनी व सार्वजनिक बांधकाम विभाग तथा राष्ट्रीय राजमार्ग विभाग (छकख) यांच्या महत्वपुर्ण पुलांवर अंमलबजावणी करणेकामी यांच्या स्तरावर विचार होणार आहे.

नेमकं कसं काम करते ही यंत्रणा ?

पुलावरील वाहतुकीनुसार निर्माण होणारी कंपनं (वेगवेगळया दिशांमधील निर्माण होणारे व्हायब्रेशन), पिलर्सची हालचाल, पुलावरील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वायलन्स कॅमेरे, लोकांना सजग करणेसाठी सायरन (पुलाच्या दोन्ही बाजुस एक किलोमीटर लांबपर्यंत एैकु जाईल), पुराची पातळी तथा तेथील तापमान, आर्द्रता, हवेची गती यांची नोंद घेतली जाते. वरील सर्व सेन्सर्स हे सोलार एनर्जीवर काम करणारे आहेत.

या माहितीमुळे पुलाखालील पुर पातळी कळण्यास, पुलाबाबतीत एखादी दुर्घटना घडण्याअगोदर पुर्वसुचना मिळण्यास किंवा दुर्भाग्यवश पुलाबाबतीत एखादी दुर्घटना घडल्यास लोकांना तात्काळ सजग करणेकामी आपोआप सायरन सुरु होण्यास मदत होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *