Friday, April 26, 2024
Homeनगरअहिल्यादेवी स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, जलाभिषेक

अहिल्यादेवी स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, जलाभिषेक

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.30) रात्री चौंडी इथे क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचं पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. तसेच हेलिकॉप्टरमधून अहिल्यादेवींच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करून अनोखे अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

आमदार पवार यांना कार्यक्रम घेण्यास शासनाने परवानगी नाकारल्यानंतर जयंतीच्या पूर्वसंधेलाच आ. पवार यांनी जलाभिषेक, पुष्पवृष्टी, अहिल्यादेवी यांची पणत्यांमधून थ्रीडी प्रतिकृती असे विविध उपक्रम राबवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त 298 फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करून राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मध्यरात्रीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा आ. पवार यांच्याहस्ते करण्यात आली. चौंडी येथील महादेवाचं मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशाप्रकारे पहिल्यांदाच रात्री 12 वाजता सर्वांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करता आली,

चौंडीतील सीना नदीपात्रात 41 हजार पणत्यांपासून (50 बाय 50 आकारात) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीची अनोखी मानवंदना देण्यात आलीय. कलाकार उद्देश पघळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही प्रतिकृती साकारली. ह.भ.प. गडदे महाराज यांनी किर्तन सेवा बजावली.

राज्याच्या व देशाच्या विविध भागातून चौंडीमध्ये येणार्‍या सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.

पवारांना राम शिंदेंपेक्षा जास्त राजकारण कळतं

राजकारणाच्या बाबतीत मला वाटते की पवारांना राम शिंदेंपेक्षा जास्त कळतं. त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत. ज्या ठिकाणी खरंच राजकारण करायला हवं, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये असा खोचक टोला आ. रोहित पवार यांनी आ.राम शिंदे यांना यावेळी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या