अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीत दुरंगी लढत

jalgaon-digital
4 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ व आ.डॉ किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठनेते मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत होत आहे. तर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवा निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल 287 अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांपैकी 11 अर्ज छाननीत नामंजूर झाले. त्यामुळे आता 276 अर्ज शिल्लक राहिले होते. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 227 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 49 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्वात अगोदर माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने आपले उमेदवार घोषित केले. यात पिचड पिता -पुत्र व राजेंद्र डावरे या तीन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. तर उर्वरित 18 जागांवर नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यात काही जुने कार्यकर्ते, तर काही तरुणांचा समावेश आहे.

यानंतर जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांचे पुत्र विक्रम नवले तसेच माजी संचालक कचरू शेटे यांचे पुत्र विकास शेटे यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

तर परिवर्तनाची हाक देणारे ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी विकास व शेतकरी समृद्धी मंडळातच आता सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे –

इंदोरी गट :- भाऊसाहेब निवृत्ती खरात, प्रकाश किसन नवले, वैभवराव मधुकरराव पिचड, अकोले गट:-माणिक रामराव देशमुख, संदीप किसन शेटे, रामनाथ हौशिराम वाकचौरे, आगार गट:-सुधाकर काशिनाथ आरोटे, सुनील सुखदेव कोटकर, किसन रेवजी शेटे, देवठाण गट:- बाबासाहेब बाळासाहेब उगले, जालिंदर वामन वाकचौरे, भाऊसाहेब नामदेव वाकचौरे, कोतुळ गट :-राजेंद्र नानासाहेब देशमुख, बाळासाहेब गणपत सावंत, रावसाहेब तुकाराम शेळके, इतर मागासवर्गीय मतदारसंघ:- बाळासाहेब काशिनाथ वडजे, महिला राखीव प्रतिनिधी:- सौ.आरती नानासाहेब मालुंजकर, सौ.रंजना भाऊसाहेब नाईकवाडी, अनुसूचित जाती – जमाती प्रवर्ग:- मधुकरराव काशिनाथ पिचड, भटक्या विमुक्त जाती-जमाती:- सुभाष बंडू काकड, बिगर उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी :- राजेंद्र दत्तू डावरे आदी आहेत.

शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार पुढीलप्रमाणे –

अकोले गट- कैलास भास्कर वाकचौरे, मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ, विक्रम मधुकरराव नवले, इंदोरी-पाटीलबा सावंत, अशोक देशमुख, प्रदीप हासे, आगर गट-परबत नामदेव नाईकवाडी, विकास कचरू शेटे, अशोक झुंबरराव आरोटे, कोतूळ-यमाजी लहामटे, मनोज देशमुख, कैलास शेळके, देवठाण- बादशहा बोंबले, रामनाथ बापू वाकचौरे, सुधीर शेळके, बिगर उत्पादक/पणन संस्था प्रतिनिधी-सीताराम गायकर, अनुसूचित जाती जमाती-अशोकराव यशवंतराव भांगरे, महिला राखीव-सुलोचना नवले, शांताबाई देशमुख, इतर मागासवर्गीय मतदारसंघ-मिनानाथ सखाराम पांडे, भटक्या विमुक्त जाती जमाती-सचिन दराडे आदी आहेत.

माजीमंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात सरळ लढत होत आहे. महिला राखीव, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी तसेच भटक्या विमुक्त जातीजमाती मतदारसंघात दोन्हीही मंडळांमध्ये सरळ लढत होणार आहे. उत्पादकांच्या इंदोरी, अकोले, देवठाण आणि कोतूळ या गटांमध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी सात-सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातही अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, काँग्रेसचे ज्येष्ठनेते व विद्यमान संचालक मिनानाथ पांडे यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित असली तरी एक अपक्ष उमेदवारही या मतदारसंघात आपले नशीब अजमावत आहे.

शेतकरी समृद्धी मंडळाला समर्थन देणार्‍या रिपब्लिकन पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळालेली नाही.शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली आहे. आ.डॉ. किरण लहामटे यांचे वडील माजी जि. प. सदस्य यमाजी लहामटे यांना कोतूळ गटातून शेतकरी समृद्धी मंडळाने उमेदवारी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *