Thursday, April 25, 2024
Homeजळगावकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी

जळगाव । Jalgaon –

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील काही जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकर्‍याच्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे सादर करा. जेणेकरून शासनाच्या मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, तसेच शेतकर्‍यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा शासनातर्फे अधिवेशन काळातच केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे शेतकर्‍यांना दिला.

- Advertisement -

अमळनेर तालुक्यातील कु-हे, टाकरखेडा, धरणगाव तालुक्यातील भोज व एरंडोल या गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा देताना कृषीमंत्री सत्तार बोलत होते. यावेळी त्यांचेसमवेत विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अमोल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषि अधिकारी जाधवर, यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले, अवकाळी व गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकर्‍याला मदत मिळाली पाहिजे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सहा महिन्यात 12 हजार कोटींची सर्वाधिक मदत

गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सुमारे 12 हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना केलेली नाही. यावेळीही शेतकर्‍यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषीमंत्री सत्तार यांनी सांगितले.

अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करणेबाबत यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकर्‍यांना लवकरच नुकसान भरपाईची घोषणा विधानसभ व विधान परिषदेत करणार आहेत, असेही कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

थेट बांधावर जावून पाहणी

कु-हे, टाकरखेडा, भोज, एरंडोल आदि ठिकाणी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री सत्तार यांनी आज पाहणी करुन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या