Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगकिसान रेल्वे - एक क्रांतिकारी पाऊल

किसान रेल्वे – एक क्रांतिकारी पाऊल

भारतीय रेल्वेचा इतिहास पाहिला तर असे निदर्शनास येते की एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात 1832 ते 1852 या काळात भारतीय रेल्वे मधून मुख्यतः औद्योगिक क्षेत्रासाठी मालवाहतूक केली जात असे. भारतात पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (मुंबई ) ते ठाणे अशी 34 किलोमीटर धावली. भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीचा विस्तार 1853 ते 1924 या काळात झाला. 1925 पासून भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण आणि विस्तार कार्य करण्यात आले. 1951 ते 1983 या काळात भारतीय रेल्वेच्या पुढील विकासासाठी क्षेत्रीय संघटन करण्यात आले. 1984 पासून भारतीय रेल्वेच्या वाहतूक आणि विकासाला आणखी गती देण्यात आली.

भारतीय रेल्वे ही विस्ताराच्या दृष्टिकोनातून अमेरिका (2,50,000कि.मी.), चीन (1,00,000कि.मी.) आणि रशिया (85,000कि.मी.) नंतर जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वेचे जाळे हे आशिया खंडातील सर्वात मोठे जाळे असून त्याचा विस्तार जवळपास 65,000 कि.मी.पेक्षा अधिक आहे. सामान्य स्थितीत भारतात दररोज 19,000 पेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावतात. यापैकी साधारण 12000 रेल्वे गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी तर साधारण 7000 रेल्वे गाड्या मालवाहतुकीसाठी असतात. या रेल्वे सुविधांचा वापर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करण्यास आपल्याला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर मिळून जवळपास 19 दशकांचा कालावधी लागला आहे.

- Advertisement -

भारतात आर्थिक वर्ष 2020- 21साठी फेब्रुवारी 2020 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री मा.निर्मला सीतारामण यांनी सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (PPP) च्या माध्यमातून किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून केंद्रीय वित्त मंत्री मा.निर्मला सीतारमण, केंद्रीय कृषिमंत्री मा.नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री मा.पियुष गोयल यांच्या एकत्रित प्रयत्नातून किसान रेल्वे सुरू करण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतला आणि 07ऑगस्ट 2020 रोजी भारतातील पहिली किसान रेल्वे महाराष्ट्रातील देवळाली (नाशिक) ते बिहार मधील दानापूर या रेल्वे मार्गावर 1519 कि.मी. इतकी धावली. या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान किसान रेल्वेला जवळपास वीस थांबे आहेत. हा प्रवास कालावधी साधारण 32 तासांचा आहे. या अगोदर देखील कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी रेल्वेची सुविधा होती, परंतु त्या सुविधेचा उपयोग केवळ एका वेळी एकाच कृषी उत्पादनासाठी होत असे. किसान रेल्वे सुरू केल्यामुळे मात्र एकाच रेल्वेतून दूध, फळे, फुले ,भाजीपाला ,मासे, मांस इत्यादी शेतमालाची वेगवेगळ्या वातानुकूलित रेल्वे डब्यांमधून वाहतूक करणे शक्य होत आहे.

किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या सुविधेचा विस्तार आणखी वाढविण्यात आला. महाराष्ट्र आणि बिहार या दरम्यान सुरुवातीला आठवड्यातून एकदा धावणारी किसान रेल्वे 08 सप्टेंबर 2020 पासून आठवड्यातून तीन वेळा धावते आहे. याशिवाय 09 सप्टेंबर 2020 पासून दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश या राज्यातील अनंतपूर ते दिल्लीतील आदर्श नगर यादरम्यान दुसरी किसान रेल्वे सुरु करण्यात आली आहे.

या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च प्रति टन जवळपास 1000 रुपये याप्रमाणे कमी होणे अपेक्षित असून वाहतुकीचा कालावधी देखील 15 तासांनी कमी होणार आहे. किसान रेल्वेतून मालवाहतूक करण्यासाठी शेतकर्यांना अगदी 50 ते100 किलो पासून देखील माल पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय दिलेल्या मार्गावरील कोणत्याही थांब्या पासून दुसऱ्या कोणत्याही थांब्या पर्यंत शेतकरी आपला शेतमाल पाठवू शकतात. शिवाय काही कारणामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास रेल्वेकडून योग्य ती भरपाई देखील मिळणार आहे.

किसान रेल्वेची सुविधा योग्य नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून विस्तारत गेल्यास या सुविधेमुळे शेतकरी, मध्यस्थ -व्यापारी, भारतीय रेल्वे, ग्राहक आणि शेवटी सरकार या पाचही घटकांचा लाभ होणार आहे. कारण नाशवंत स्वरूपाचा शेतमाल वातानुकूलित आणि वेगवान वाहतूक सुविधेमुळे कमी खर्चात उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास या सुविधेचा लाभ होणार आहे. ग्राहकाकांपर्यंत पोहोचणाऱ्या शेतमालाचा दर्जा चांगला राहिल्यामुळे त्याला योग्य तो भाव देखील मिळण्यास मदत होईल. परिणामी व्यापारी वर्गाकडून दूध, फळे, फुले,भाजीपाला, मासे,मांस, इत्यादी सारख्या नाशवंत शेतमालाची देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल आणि शेतकरी देखील या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे नियोजन करू शकतील.

थोडक्यात असे म्हणता येईल की आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या रेल्वे सुविधेच्या माध्यमातून किसान रेल्वेचा भारतात नियोजनबद्ध विकास करून भारतातील महानगरे आणि मोठी शहरे बाजारपेठ म्हणून तर ग्रामीण भाग उत्पादक म्हणून किसान रेल्वेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्यास तसेच भारतीय शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची बंदरे आणि विमानतळे यांच्या दरम्यान किसान रेल्वेच्या माध्यमातून वातानुकूलित पुरवठासाखळी व साठवणूक व्यवस्था यांचा विस्तार केल्यास, किसान रेल्वेही भारतीय कृषी क्षेत्रात हरितक्रांती आणि धवलक्रांती नंतरचे एक महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल ठरेल असे वाटते. त्यासाठी गरज आहे ती केंद्र सरकार ,भारतीय रेल्वे ,कृषी मंत्रालय, मध्यस्थ -व्यापारी ,आयात-निर्यात यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील योग्य समन्वयाची.

– डॉ.मारुती कुसमुडे

(लेखक कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या