देवळाली येथून उद्यापासून कृषी रेल्वे

jalgaon-digital
2 Min Read

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा तसेच द्राक्ष उत्पादन होते. तसेच नाशिकचे द्राक्ष परदेशात निर्यात होतात. उत्पादित शेती मालाच्या विक्रीसाठी जलद व सुरक्षित वाहतुक होणे गरजेचे असल्याने नाशिकला उत्तम व निर्जतूक तसेच वातानुकूलित बोगींची व्यवस्था असलेल्या कृषी रेल्वेने जोडावे, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून दि.७ ऑगस्टपासून देवळाली कॅम्प येथून प्रत्यक्ष कृषी रेल्वे सुरू होत आहे.

यामुळे जिल्हयातील शेतकर्‍यांना अवघ्या काही तासांत राज्यातील व राज्याबाहेरील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. खा. गोडसे यांनी आज रेल्वेच्या विविध योजना तसेच प्रकल्प नाशिकला व्हावेत या विषयी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार आवाज उठविला.

कांदा उत्पादनात राज्यात नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. तर द्राक्ष उत्पादनात जिल्हा राज्यभरात प्रसिद्ध आहे. कांदा आणि द्राक्ष हे नगदी पिके असल्याने या उत्पादनावर शेतकर्‍यांचे आर्थिक गणिते अवलंबून असते. जिल्ह्यात कांदा, द्राक्ष यासह भात आणि पालेभाजांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर निघते. उत्पादित मालाची जलद वाहतूक आणि विकी योग्य बाजारपेठ सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

यासाठी राज्यात तसेच देशभरात जाणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये उत्तम आणि निर्जंतूक तसेच वातानुकूलित साठवणूक व्यवस्था उपलब्ध असलेल्या बोगींची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी नाशिकला कृषी रेल्वेने जोडण्याची आग्रही मागणी खा. गोडसे यांनी संसदेत केली होती.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उद्यापासून (दि. ७) पहिली कृषी रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे. ही कृषी रेल्वे मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर मार्गे दानापूर या मार्गावर धावणार आहे. या कृषी रेल्वेचे भाडेही इतर नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यांपेक्षा कमी असेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *