कृषी विज्ञान संकुल राज्याला दिशादर्शक : भुसे

jalgaon-digital
3 Min Read

मालेगाव । प्रतिनिधी

कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून एकाच छताखाली पाच शासकीय कृषी महाविद्यालये हे मालेगाव पंचक्रोशीसह राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतीच्या आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुसे बोलत होते.

यावेळी आ. मौलाना मुफ्ती मोहम्मद, महात्मा फुले कृषी विज्ञापीठ राहुरीचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव मोहन वाघ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. डी. पवार, नियंत्रक विजय कोते, सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके, विभागप्रमुख डॉ. दादा यादव, काष्टीचे कृषी व्यवसाय व्यवस्थापन प्रकल्प अधिकारी विश्वनाथ शिंदे, संजय दुसाने आदींसह विविध विभागांचे तज्ज्ञ, कृषी विज्ञान संकुलाचे अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील काष्टी परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कृषी विज्ञान संकुल हे शाश्वत विकासाचे प्रतीक म्हणून साकारण्यात येत असल्याचे सांगताना भुसे म्हणाले, सुमारे 250 हेक्टरमध्ये साकारण्यात येणार्‍या या पाचही महाविद्यालयांचा आराखडा तयार करताना तो पर्यावरणपूरक राहील. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासह अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यावर विचारविनिमय करून सर्वसमावेशक असा आराखडा पुढील पंधरा दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मालेगाव तालुक्यातील या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी जागेची व निधीची कमतरता नसून यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिक शेतकर्‍यांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यात ग्रीन बिल्डिंग संकल्पना, मेगा फूड पार्क, शेतकरी भवन, सोलर पॉवर जनरेशन, हेल्थ केअर सेंटर, जीम, मॉल, सेंट्रल लायब्ररी, सर्व सुविधायुक्त वसतिगृह आदी बाबींचा समावेश करण्यात यावा. या संकुलात शैक्षणिक पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना या प्रकल्पासाठी उपयोगात घेण्यात याव्यात, असे निर्देशही भुसे यांनी यावेळी दिले.

कृषी विज्ञान संकुलाच्या आराखड्यात उत्पादित युनिटचा समावेश करण्याचे सांगताना अधिष्ठाता डॉ. रसाळ म्हणाले, फळे, भाजीपाला नर्सरीप्रमाणेच बेकरी प्रॉडक्टची सुविधा या ठिकाणी करण्यात यावी. मदर प्लांटच्या प्लॉटचाही यात अंतर्भाव करण्यात यावा.

सेंट्रल परचेसिंगसह सेंट्रल गोडाऊन उभारल्यास सुमारे 30 ते 40 टक्के खर्चात बचत होऊ शकते. वर्षभर शेतीविषयक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठीच्या सुविधेचाही यात अंतर्भाव करण्यासह विविध बाबींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. विद्यापीठातील उपस्थित विविध विभागातील तज्ज्ञांनी सादर केलेल्या सर्व सूचना व मार्गदर्शन याचा गोषवारा संकलित करून त्याचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात येईल व या प्रकल्पाचा आराखडा मंजूर करण्याचे आश्वासनही भुसे यांनी यावेळी दिले.

Share This Article