Friday, April 26, 2024
Homeनगरशेतीचा वीजपुरवठा बंद केल्यास रूम्हणे मोर्चा काढू- आ. कानडे

शेतीचा वीजपुरवठा बंद केल्यास रूम्हणे मोर्चा काढू- आ. कानडे

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

थकीत विजबिलाचे कारण पुढे करुन शेतकर्‍यांचा विज पुरवठा बंद करणार असाल तर याद राखा, वेळ पडली तर रुम्हणे मोर्चा काढू, असा स्पष्ट इशारा श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहू कानडे यांनी महावितरणला दिला आहे.

- Advertisement -

शेतीच्या थकीत विजबिल वसुलीसाठी 25 मे पासून महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे. याबाबत माहिती मिळताच आमदार लहू कानडे यांनी भ्रमणध्वनीवरुन महावितरणच्या उच्च अधिका-यांशी संवाद साधला असता संबधीत अधिकार्‍याने सांगितले, शेतीच्या विजबिल थकबाकी पोटी चालू बिल शेतकर्‍यांना भरावे लागणार आहे. बिल न भरल्यास रोहित्र बंद ठेवण्यात येईल, असे सांगितल्या नंतर आमदार कानडे म्हणाले, थकबाकी पोटी कनेक्शन कट करु नका.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, विजबिल थकबाकी पोटी शेतकर्‍यांचे विजकनेक्शन तोडू नका. आम्ही तसे महावितरणला आदेशही दिले आहेत. आणि तुम्ही म्हणता विजबिल भरावे लागेल. मग नेमकं खोट कोण बोलतयं? शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी कोण खेळतयं? अतिवृष्टी मधून बाहेर पडतो नाही तोच शेतकरी अवकाळीच्या संकटात सापडला. अवकाळी पावसाने लाखोटन कांदा शेतात सडला. हातात रुपया देखील राहीला नाही. एकीकडे महागाई आकाशाला भिडलेली असतांना शेतमालाला भाव नाही. मातीमोल भावात माल विकावा लागत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. वरुन सरकार म्हणतयं हे शेतकर्‍यांचं सरकार आहे? आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी आहोत? असे म्हणून शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम हे सरकार करीत आहे.

खिशात एक दमडी नसतांना ऐन उन्हाळ्यात शेतकरी विजबिल भरणार कुठूनं. इथं पिण्याच्या पाण्याची मारामार झाली असतांना व तिव्र उन्हामुळे पिकं पाण्यावर असतांना तुम्ही रोहीत्र बंद ठेवण्याचे आदेश कसे देऊ शकता? असा सवाल करुन आमदार कानडे म्हणाले शेतीला विज पुरवठा करणारे रोहीत्र बंद कराल तर याद राखा. आता फक्त बोललो आहे.उद्या जर रोहित्र बंद झाले तर मात्र महावितरणच्या कार्यालयावर रुम्हणे मोर्चा काढला जाईल.

महावितरणच्या वरील आदेशाने शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहे. विजबिल वसूली आदेश महावितरणने तातडीने मागे न घेतल्यास महावितरणला शेतकर्‍यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.त्यावेळी होणार्‍या परिणामाची सर्व जबाबदारी महावितरणवर राहील, असा स्पष्ट इशारा शेवटी आमदार कानडे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या