Thursday, April 25, 2024
Homeनगरशेती वीज रोहित्र बंद निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक

शेती वीज रोहित्र बंद निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शेतीवाहिनीवरील 17 रोहित्रं थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर पाचेगाव, पुनतगाव येथील शेतकरी आणि महावितरण अधिकारी यांची समनव्य बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत शेतकरी संघटना आणि परिसरातील शेतकर्‍यांनी या थकीत वीजबिल वसुलीच्या तुघलकी निर्णयाविरोधात आक्रमक होत कडाडून विरोध केला.

- Advertisement -

सध्या विजेची मागणी वाढल्याने शेती वाहिनीवर भारनियमन केले जात आहे. ग्रामीण भागातील शेतीला सध्या आठ तासांऐवजी फक्त पाच तास वीज मिळते.त्यातही अनेकवेळा विजेचा लपंडाव सुरू असतो. रोहित्रावरील दैनंदिन देखभालीचा खर्च सुद्धा शेतकर्‍यांनाच करावा लागतो. त्यात आता महावितरणच्या थकीत वीजबिल वसुलीमुळे शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. अशा अनेक समस्या या बैठकीत मांडण्यात आल्या.

पाचेगाव परिसरात जवळपास 90 ते 95 रोहित्रे आहेत,त्यात जवळपास 714 वीज ग्राहक आहेत.पण सध्या शेतकर्‍यांनी कांदा बियाणे, ऊस लागवड, हरभरा पेरणी केली.त्या पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी वर्ग सध्या करीत आहे.पण पाणी असून पिके जर पाण्यावाचून करपू लागली तर शेतकर्‍यांनी काय करावे हेच शेतकर्‍यांना समजेना. त्यामुळे वीज वसुली सध्या तरी थांबून तात्पुरती स्थगिती देण्यात यावी,अशी आग्रही मागणी शेतकरी करीत आहे.

शेतकर्‍यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सहाय्यक अभियंता निकम यांनी वसुलीसाठी बंद केलेले रोहित्र पाच दिवसांसाठी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले असून त्यांनतर थकीत वीजबिल न भरल्यास पुन्हा रोहित्र बंद करणार असल्याची सूचना शेतकर्‍यांना केली आहे.

बैठकीला बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तुवर,नेवासा दुष्काळ निवारण समितीचे तालुकाध्यक्ष दिलीप पवार, अशोकचे संचालक दिगंबर तुवर, श्रीकांत पवार, पुनतगावचे अशपाक देशमुख, अ‍ॅड सोमनाथ वाकचौरे, प्रकाश जाधव, दत्तात्रय पाटील, सुधाकर शिंदे, साहेबराव पवार, भगीरथ पवार, बाळासाहेब शिंदे, बाजीराव कोळसे, रामभाऊ जाधव, गोरख राशीनकर, अविनाश शिंदे, सुनील शिंगोटे आदींनी चर्चेत भाग घेत शेतकर्‍यांप्रती भूमिका मांडल्या. यावेळी महावितरणचे भोकर येथील सहाय्यक अभियंता वैभव निकम, महावितरणचे कर्मचारी, पाचेगाव आणि पुनतगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या