Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिव्यांगांचे मनपासमोर आंदोलन

दिव्यांगांचे मनपासमोर आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहर-परिसरात काल जागतिक अपंग दिन दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आंदोलने करीत साजरा केला. मनपा प्रवेशव्दारासमोर दिव्यांग सोसायटीतर्फे तब्बल सहा तास धरणे आंदोलन करण्यात येवून घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला होता. तर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.

- Advertisement -

शासनाने दिव्यांगांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. मात्र या योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर यंत्रणेतर्फे केली जात नसल्याने आज जागतिक अपंगदिनी देखील आम्हाला आमच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर येवून आंदोलन करावे लागत आहे. दिव्यांगांबद्दल अधिकार्‍यांना किती सहानभुती आहे हेच प्रलंबित मागण्यांव्दारे स्पष्ट होते, अशी टिका दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष मुदस्सीर रजा यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

जागतिक अपंग दिनानिमित्त शहरातील दिव्यांग एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीतर्फे मनपा प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. मासिक 1 हजार रूपये पेन्शन नियमित मिळावे तसेच व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना जागा उपलब्ध करून द्यावी तसेच घरकुल योजनेत घरे मिळावीत व शहरातील इतर सामाजिक संघटनांना ज्या पध्दतीने भुखंड दिले जाते त्याच पध्दतीने दिव्यांगांच्या कार्यालयासाठी महासभेत ठराव करत जागा मिळावी. शहरातील दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविले जावेत आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले.

सोसायटी अध्यक्ष मुदस्सीर रजा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त दीपक कासार यांना निवेदन सादर केले. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले. या आंदोलनात सोसायटी सचिव अन्सारी नईम, अक्तर हुसेन, अ‍ॅड. तालीप अन्सारी, अरबाज एकबाल, एजाज अहमद, समीर नदीम अहमद, खलील अहमद शब्बीर खान, जनार्दन बिरारी, शेख सुलताना, मुजम्मील आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग महिला, पुरूष सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या