Friday, April 26, 2024
Homeनाशिकबाधित शेतकर्‍यांना जमिनीचा पुरेपूर मोबदला मिळणार

बाधित शेतकर्‍यांना जमिनीचा पुरेपूर मोबदला मिळणार

सिन्नर । Sinnar

देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या निर्मितीत नाशिक तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील 17 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत. बाधित शेतकर्‍यांना शासन कधीच वार्‍यावर सोडणार नाही.

- Advertisement -

शासन आणि मी स्वत: शेतकर्‍यांच्या बाजूने विचार करणार आहे. गेल्या तीन वर्षात अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकर्‍यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मुल्यांकन करुन सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकर्‍यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिगोटे, मोनोरी, दोडी खुर्द, बुद्रूक, शिवाजीनगर, दातली, गोंदे, मुसळगाव, कुंदेवाडी, कसबे सिन्नर, बारगाव पिंप्री, पाटप्रिंप्री, देशवंडी, वडझिरे, मोह, चिंचोली, वडगाव पिंगळे या 17 गावांमधून हा रेल्वे मार्ग जात आहे.

या गावातील बाधित शेतकर्‍यांची आज पंचवटी मोटेल्स सभागृहात विशेष बैठक पार पडली. नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कातोडे, प्रांताधिकारी पुजा गायकवाड, युवानेते उदय सांगळे, संजय सांगळे, दिपक बर्के, संग्राम कातकाडे, विजय कातकाडे, संजय सानप आदींसह शेतकरी उपस्थित होते.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांच्या कुंटुबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी, प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुस सर्व्हिस रोड असतावेत, बाधित क्षेत्राचा सातबार्‍यावर सध्यास्थितीतील असलेल्या झाडांच्या नोंदी असतो वा नसोत तरी झाडांची भरपाई ग्राह्य धरावी, बाधित शेतकर्‍यांच्या कुंटुबियांना नाशिक – पुणे रेल्वे गाडीत मोफत प्रवास सुविधा मिळावी, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, गरजेपेक्षा जास्त् क्षेत्र संपादित करुन नये, औद्योगिक क्षेत्रातील कंपनी बाधित होणार नाही, याची अधिकाधिक काळजी घ्यावी, छोटे-छोटे पुल नेमके कुठे आहेत, क्रॉसिंग स्टेशन कुठे-कुठे आहेत, पाईपलाईन कुठे-कुठे आणि कशाप्रकारची टाकणार आहेत याची सविस्तर माहिती शेतकर्‍यांना मिळावी आदी मौलीक सूचना यावेळी 17 बाधित गावांमधील शेतकर्‍यांनी मांडल्या.

तहसीलदार कोताडे आणि नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शेतकर्‍यांच्या शंका-कुशंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. अजुन काही शंका-कुशंका तसेच काही हरकती असल्यास सक्षम अधिकार्‍याकडे लेखी नोंदवाव्यात, असे आवाहन यावेळी खा. गोडसे यांनी केले आहे.

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा देशातील पहिला सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे नाशिक-अहमदनगर या जिल्ह्यांचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा पुरेपूर मोबदला मिळणार आहे.

रेडीरेकनरचा दर खूपच कमी असल्याने गेल्या तीन वर्षात अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकर्‍यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मुल्यांकन करुन सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकर्‍यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खा. गोडसे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या