Saturday, April 27, 2024
Homeनगरराजकारण्यांनी निळवंडेचा केवळ साठवण तलाव केला होता- अ‍ॅड. काळे

राजकारण्यांनी निळवंडेचा केवळ साठवण तलाव केला होता- अ‍ॅड. काळे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

गत पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबीत असलेला व उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणारा

- Advertisement -

निळवंडे प्रकल्प जिल्ह्यातील राजकारण्यांनी केवळ साठवण तलाव बनवून आपला व आपल्या कारखान्यांचा स्वार्थ साधण्याचे काम सुरू ठेवले होते. मात्र निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा प्रश्न धसास लागला असून आता हे सिंचनाचे पाणी कोणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.अजित काळे यांनी जवळके येथे बोलताना व्यक्त केला आहे.

जवळके येथे अण्णासाहेब शिंदे व जहिर सय्यद यांच्या साई समीक्षा व ओम साई राम मिल्कने विक्रमी दूध पुरवठा करणार्‍या दूध उत्पादकांचा सत्कार अ‍ॅड. अजित काळे यांच्या हस्ते आयोजित केला होता.

अध्यक्षस्थानी उद्योजक मयूर टेमगिरे होते. प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले, ज्येष्ठ नेते नानासाहेब गाढवे, काशिनाथ शिंदे, भिवराज शिंदे, माधवराव गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, गोरखनाथ शिंदे, सोपान थोरात, सोमनाथ दरंदले, कौसर सय्यद, विश्वनाथ शिंदे, बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, प्रभाकर गोसावी, दत्तात्रय गोसावी, नवनाथ शिरोळे, दगडू रहाणे आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते.अ‍ॅड. काळे म्हणाले, हा प्रकल्प उत्तर नगर जिल्ह्यातील प्रवरा व गोदाकाठच्या राजकीय नेत्यांनी खूप अडचणीत आणून ठेवला होता.

त्याचे कालवे होणार नाही याचीच तजवीज करून ठेवली होती. मात्र कालवा कृती समितीने याबाबत केंद्र सरकारच्या चौदा मान्यता दिल्लीत पाठपुरावा करून व उर्वरित तीन मान्यता उच्च न्यायालयामार्फत मिळवल्या आहेत. काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सरकारकडून उच्च न्यायालयात मिळवले आहे. त्यामुळे आगामी एक ते दीड वर्षात हे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात दिसणार आहे. महावितरण कंपनी कशी शेतकर्‍यांची वीजबिलाबाबत लुबाडणूक करत आहे. हे उदाहरणासहित स्पष्ट केले व वीज बिल शेतकर्‍यांना गरजेचे नाही.

कारण वीज कंपन्या सरकारकडून चोवीस तासांचे वीज बिल आकारत असून त्यातील पन्नास टक्क्यांचा हिस्सा म्हणून सरकार साडे तीन हजार कोटींचा भरणा महावितरण कंपनीला करत असताना ही कंपनी केवळ चोवीस तासातील केवळ आठ तास व तीही रात्री वीज देऊन शेतकर्‍यांची लूट करीत आहे.

या उलट शेतकरीच महावितरण कंपनीकडून घेणे कसा लागतो याचा जाहीर हिशेबच सांगून टाकला व वीज बिलापोटी व विद्युत रोहित्र जळाल्यास एक रुपयाचीही वर्गणी देऊ नका असा सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा हवाला देऊन असे आवाहन केले आहे.

त्यावेळी सरकार हमीभावाची कशी फसवणूक करीत आहे, याचाही उहापोह केला. स्वागत काशिनाथ शिंदे,अण्णासाहेब शिंदे व जहिर सय्यद,भिवराज शिंदे यांनी केले. सुत्रसंचलन माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी तर उपस्थितांचे आभार कौसर सय्यद यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या