Sunday, May 5, 2024
Homeनगरआकारी पडीत शेतकर्‍यांच्या प्रश्नात शासनाकडून न्यायालयात दिशाभूल

आकारी पडीत शेतकर्‍यांच्या प्रश्नात शासनाकडून न्यायालयात दिशाभूल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खंडकर्‍यांच्या प्रश्नापेक्षा अकारी पडीत शेतकर्‍यांचा प्रश्न सोपा असतानाही शासनाकडून सद्य परिस्थितीत न्यायालयात दिशाभूल केली जात आहे, असा आरोप अ‍ॅड. अजित काळे यांनी केला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्न सोडविला तर त्यांच्या सत्काराचा पहिला हार आम्ही टाकू असेही ते म्हणाले.

- Advertisement -

शेती महामंडळाच्या हरिगाव मळा पंचक्रोशीतील अकारी पडीत शेतकर्‍यांची कोविड नियमांचे पालन करत उंदीरगाव येथे बैठक पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करताना अ‍ॅड. काळे म्हणाले, खंडकरी चळवळीप्रमाणे आकारी पडीतमध्येही अनेक कार्यकर्त्यांचे गट असून सर्वांचे ध्येय एकच आहे. हा प्रश्न महसूल खात्याकडून लवकरात लवकर सुटावा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रत्येक शिष्टमंडळास सांगतात आम्ही शेतकर्‍याबरोबर आहोत. आपण बरोबर आहात तर मग आपल्या महसूल खात्याच्या सचिवाकडून आकारी पडीत शेतकर्‍यांच्या विरोधात उच्च न्यायालय खंडपीठात शपथपत्र कसे दाखल करण्यात आले? असा सवाल अ‍ॅड. काळे यांनी केला.

खंडकर्‍यांच्या प्रश्नापेक्षा आकारी पडीत शेतकर्‍यांचा प्रश्न सोपा असतानाही शासनाकडून सध्य परिस्थितीत न्यायालयात दिशाभूल केली जात आहे. यापूर्वी तत्कालीन महसूल सचिव प्रकाश बर्वे यांनी आकारी पडीत शेतकर्‍यांच्या बाजूने शपथपत्र दाखल केले होते. सरकार बदलले युती सरकारच्या काळात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर शिष्टमंडळाने भेटी घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा सरकार बदलल्यानंतर योगायोगाने पुन्हा बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खात्याचा कार्यभार आला. त्यामुळे आकारी पडीत शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या.

कारण या प्रश्नांची थोरात यांना संपूर्ण माहिती आहे. या आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लागेल. परंतु महसूल विभागाच्या राज्य शेती महामंडळाकडून राज्यातील इतर मळ्यांप्रमाणे हरिगांव, टिळकनगर येथील शेकडो एकर जमीन प्लॉटचे राजकीय नेतेमंडळीनी नातेवाईकांचे नावावर कसण्यासाठी करार पध्दतीने वाटप होऊ लागले. यावर आम्ही औरंगाबाद खंडपीठात हरिगाव मळा आकारी पडीत 242 शेतकर्‍यांच्यावतीने स्थगिती मिळविण्यासाठी याचिका दाखल केली. त्यावर शेती महामंडळाच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. 6 जूनला सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु करोना पार्श्वभूमीवर सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

शासनाने आकारी पडीत जमिनी शासनाच्या मालकीच्या आहेत असा एखादा तरी कागदोपत्री पुरावा न्यायालयात सादर करावा, अशी मागणी करत अ‍ॅड. काळे म्हणाले, या जमिनी शासनाच्या नाहीत असे शासनाने सादर केलेले पुरावे आमच्याकडे आहेत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तर मी आपल्यासमवेत सहभागी होईल.

यावेळी खंडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब थोरात म्हणाले, मी 1953 पासून या चळवळीत लढलो. आता आकारी पडीत शेतकर्‍यांसाठी लढा देत आहे. पुर्वी माझ्या ताब्यात एक गुंठाही जमीन नव्हती. महामंडळाकडे गेलेल्या जमिनीपैकी 13 एकर जमीन मी न्यायालयीन लढा देऊन मिळविली. आता तर आकारी पडीत हा सार्वजनिक प्रश्न असून कागदोपत्री पुरावा आपल्या बाजूने आहे. भीमभाऊ बांद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीस संपतराव मुठे, गिरीधर आसने, वस़ंतराव मुठे, आदिनाथ झुराळे, बाळासाहेब बकाल, लहानुभाऊ शेजुळ, शरद आसने, सोपानराव नाईक, बबनराव नाईक, रावसाहेब कासार, अजिंक्य गायके, सुरेश डाखे, अमोल नाईक, गोरख वेताळ, राजाबापू गलांडे, एकनाथ गायके, आप्पासाहेब काळे, लक्ष्मण चिडे, रावसाहेब काळे, कारभारी बांद्रे, श्रीकृष्ण वेताळ, प्रल्हाद वेताळ, बाबासाहेब नाईक, बाळासाहेब आसने, रावसाहेब आढाव, दत्तात्रय दळे, नारायण आसने, शिवाजी रूपटक्के, भास्कर शिंदे, शिवाजी आसने, नारायण वाघ, गंगाधर गुळवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आकारी पडीत शेतकरी संघर्ष समितीत तालुका पातळीवरील आ. कानडे, ससाणे, आदिक, मुरकुटे, विखे यांना मानणारे सर्वपक्षीय शेतकरी आहेत. मी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी असलो तरी एकाही शेतकर्‍याला आमच्या संघटनेत या असा आग्रह धरला नाही. अथवा न्यायालयीन लढाईसाठी वर्गणी जमा केली नाही. फक्त लढाई जिंकायचीच हे ध्येय समोर आहे. जो प्रश्न सोडवील त्यांनाच आम्ही श्रेय देऊ, महसूल मंत्री थोरात यांनी हा प्रश्न सोडवावा. सर्वप्रथम आम्ही पहिला हार घालू, आमचे आकारी पडीत शेतकरी घराघरांत त्यांचे फोटो लावतील. स्व. जयंतरांव ससाणे यांनी तालुक्यातील खंडकर्‍यांचा प्रश्न आपल्याकडे पाठपुरावा करून पुर्णत्वास नेल्याचे श्रेय आजही आम्ही त्यांना देत आहे.

– अ‍ॅड.अजित काळे

- Advertisment -

ताज्या बातम्या