Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापरीक्षेसाठी सल्लागार समिती

परीक्षेसाठी सल्लागार समिती

नाशिक । प्रतिनिधी

दहावी-बारावीच्या परीक्षा घेताना नेमक्या काय संभाव्य अडचणी असतील आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात हे निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने सल्लागार समिती स्थापन केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा घेण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही समिती सल्ला देणार आहे. समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार बोर्डाच्या परीक्षा अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.

- Advertisement -

बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना या परीक्षा अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. या समितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील अध्यक्षस्थानी आहेत.

तर राज्य मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. वसंत काळपांडे, सेवानिवृत्त विभागीय अध्यक्ष विनय दक्षिणदास, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय जाधव, कात्रज येथील कै. पै. हिरामण बनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड, विजयमाला कदम, कन्या प्रशालेचे उपशिक्षक नितीन म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल. एम. पवार, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले हे सदस्य आहेत.

या समितीची एक बैठक नुकतीच झाली असून त्यात परीक्षेदरम्यान येणार्‍या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच या अडचणी सोडवण्यासाठी काय पावले उचलणे अपेक्षित आहे यावरदेखील चर्चा झाली. समितीतील सदस्यांनी सुरक्षितरीत्या परीक्षा घेण्यासाठी काय करायला पाहिजे याबाबत उपाय सुचवले आहेत.

दहावी-बारावीच्या एप्रिल-मे 2021 मध्ये होणार्‍या परीक्षा आणि पुरवणी परीक्षा 2021 घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत सल्लागार समितीतील सदस्यांशी चर्चा केली जात आहे. या समितीत राज्य शिक्षण मंडळातील पदाधिकारी, शिक्षण संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक यांचा सदस्य म्हणून सहभाग आहे. बोर्डाच्या परीक्षेत येणार्‍या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करता येतील, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या