Friday, April 26, 2024
Homeनगरप्रशासकाचा येण्या-जाण्याचा बसेना ताळ ‘मेळ’ !

प्रशासकाचा येण्या-जाण्याचा बसेना ताळ ‘मेळ’ !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने सरपंच म्हणून शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

- Advertisement -

ग्रामसेवकापाठोपाठ नियुक्त प्रशासकही शहरवासी असल्याने ते शहरातून कधीतरी ये-जा करित मुख्यालयी येत असल्याने गावपातळीवरच्या विकासकामांना खिळ बसून दैनंदिन कामाचा खोळंबा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायतींची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच वर्षांची मुदत संपल्याने शासनाने ग्रामपंचायतीवर शासकिय अधिकारी-कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि गावपातळीवर सरपंच, सदस्यांचा दबदबा संपला.

ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यात सरपंच प्रभावी भूमिका बजावत असत. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायतीकडे महिनोगणती फिरकत नसले, तरीही सरपंचच वेळ मारून कामे पुढे रेटून नेत असत. मात्र आता ग्रामसेवकासह प्रशासकही शहरवासी होऊन ते ये-जा बहाद्दर झाल्याने परिणामी त्यांच्या दौर्‍याचा ताळमेळ अजूनही बसलेला नाही.

आठवड्यातून ग्रामसेवक निवडक दिवशी येतात. प्रशासक तर कधी येतात हे समजतही नाही. प्रशासकांनी ग्रामसेवकांना तुम्हीच सांभाळून घ्या असे म्हणत सर्वाधिकार दिल्याचे काही अंशी दिसून येत आहे. प्रशासकपदी मुख्याध्यापक, विस्तारधिकारी, शाखा अभियंते, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकाची वर्णी लागली आहे.

यातील बहुतांशी प्रशासक हे तालुक्याच्या ठिकाणाहून अथवा अन्य मोठ्या शहरातून संबंधीत गावात ये-जा करत असल्याने आता ग्रामस्थाना सरकारी कामांसाठी तालुक्याला किंवा इतर ठिकाणी जावे लागते. कामासाठी प्रशासक यांचा शोध घ्यावा लागतो. तेथेही ते भेटतील याची शाश्वती नसते. त्यांच्याशी संपर्क साधल्यास दौर्‍यावर किंवा दुसर्‍या गावांत असल्याचे उत्तर मिळते.

ग्रामसेवकापाठोपाठ प्रशासकही मुख्यालयी राहत नाही, ते शहरवासी झाले आहेत. याची चौकशी होणे गरजेचे आहे. ग्रामसेवकासह प्रशासक जर गावाकडे येणार नसतील तर काय उपयोग? अध्यक्ष – सचिव गावाच्या उपयोगी न पडता केवळ वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. गावाचा गावगाडा आता रामभरोसे सुरु असल्याचे सध्याचे चित्र आहे.

पूर्वी सरपंचाचा ग्रामसेवकावर वचक असायचा तर जनतेने निवडून दिल्याने सरपंचावर ग्रामस्थांचा दबाव असायचा. त्यातून गावगाडा चालायचा. आता प्रशासकांना कोणाची ओळख नाही, काही देणे घेणे नाही. फक्त वेळ काढायची असल्याने कारभार सुरू आहे. प्रशासकांनी महिनाभरात किती काम केले ते शोधण्याची व एकूण किती प्रशासक, ग्रामसेवक मुख्यालयी राहतात याचा आढावा घेणे गरजेचे बनले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या