Friday, April 26, 2024
Homeनगरपावसाळ्यात पेटले आढळेचे पाणी

पावसाळ्यात पेटले आढळेचे पाणी

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अकोले तालुक्यातील देवठाणच्या आढळा धरणातून संगमनेर तालुक्यातील चिकणी, सायखिंडी, निमगाव भोजापूर, वेल्हाळे, मालदाड आणि इतर काही गावांना पिण्याचे पाणी देण्यास तीव्र विरोध होत असून हा विरोध तीव्र करण्यासाठी आज डोंगरगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. डोंगरगाव येथे आढळा पाणी बचाव कृती समितीतर्फे ही बैठक आज रविवारी सकाळी 10 वा. आयोजित केली असून विरोधाची धार अधिक तीव्र होणार असून ऐन पावसाळ्यात आढळेचे पाणी पेटले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पाणीयोजनेचे पाईप डोंगरगाव शिवारात दिसू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये विरोधासाठी सुप्त वातावरण सुरु झाले होते. त्याचा आता उद्रेक होण्याची शक्यता असून पाणी देण्यास ठाम विरोध करण्याची भुमिका अकोले तालुक्यातील आढळेच्या लाभधारकांनी घेतली असून या बैठकीत यावर उहापोह होईल. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचाही विचार या बैठकीत होणार आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेतून ही योजना होणार असल्याची माहिती मिळाली असून शेवटपर्यंत याबाबत गोपनीयता ठेवण्यात आल्याचा शेतकर्‍यांचा आक्षेप आहे. याबाबत जलसंपदा खात्याचे अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता याबाबतची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.

आढळेच्या पाण्यावर तीव्र आंदोलनाची दिशा घेतल्याने अकोले-संगमनेर तालुक्यात तीव्र संघर्ष होऊ शकतो. विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, भाजपाचे जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे आणि सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी याबाबत अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांची पाठराखण करावी, अशी मागणी होत आहे.

पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही परंतु भविष्यात शेतीसाठी येणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करावी.आढळेची पाणीसाठवण क्षमता वाढवणे, बिताका किंवा कृष्णावंतीतून आढळेत पाणी उपलब्ध करणे, निळवंडे धरणातील 32 गाव पाणीपुरवठा योजनेला संगमनेर तालुक्यातील गावे जोडणे, भविष्यात निळवंडे धरणाचे पाण्याचा लाभ होणारे क्षेत्र आढळेच्या लाभक्षेत्रातून वगळणे आणि निळवंडे धरणाच्या कॅनॉल मधून उपसा जलसिंचन योजना राबवून या गावांची तहान भागविणे हे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व पर्यायांचा विचार करावा अन्यथा आढळा धरणातून पाणी जाऊ देण्यास आम्ही विरोध करु. तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

– सुनिल उगले, (जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा)

- Advertisment -

ताज्या बातम्या