Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध

औरंगाबाद जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना राबवण्यात येत असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, आ.अंबादास दानवे, आ.सतीष चव्हाण, आ.संजय शिरसाठ, आ.अतुल सावे, आ.रमेश बोरनारे, आ.उदयसिंह राजपूत, आ.प्रदिप जैस्वाल, आ. हरिभाऊ बागडे, यांच्यासह महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाणडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52% असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर करण्यासोबत स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून काही खासगी रुग्णलयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत.

तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सिजन साठा वाढविण्यात येत असून अतिरिक्त उपलब्धता सक्षम ठेवण्याचे दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता, निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने गरज असलेल्याच गंभीर रुग्णांनाच प्राधान्याने इंजेक्शन द्यावे. सरसकट सर्व कोरोना रुग्णांसाठी त्याचा वापर करु नये. तर आवश्यकता तपासून नंतरच रेमडीसिवीर इंजेक्शन रुग्णांस द्यावे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच त्याचा वापर करण्याबाबत सर्व खासगी डॉक्टरांना निर्देशीत केले असून वापर केलेल्या इंजेक्शन व रुग्णांची माहिती विहित नमुन्यात डॉक्टरांनी प्रशासनास देणे बंधनकारक आहे. तसेच हाफकिनकडे जिल्ह्यासाठी लागणाऱ्या रेमडीसिवीरची मागणी केली असून लवकरच ते प्राप्त होतील. अनावश्यक रेमडीसिवीरचा वापर केला तर अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सर्व खासगी रुग्णालयांनी शासनमान्य्‍ दराने कोविड उपचार करुन वाजवी दर आकारणे बंधनकारक आहे. त्यासाठी रुग्णालयांच्या देयकांची लेखापरिक्षकांमार्फत तपासणी करण्यात येत असून अतिरिक्त आकारण्यात आलेली रक्कम रुग्णालयाने रुग्णास परत करण्याचे आदेशित केले असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या 349 रुग्णवाहिका असून 192 उपचार सुविधांमध्ये 20572 खाटा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन खाटा 2508 तर आयसीयू खाटा 760 आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 1.57 % असून आता व्हेंटिलेटरची उपलब्धताही जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात असून सीएसआर फंडातूनही व्हेंटिलेटर प्राप्त झाले असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

मनपा आयुक्त पाण्डेय यांनी मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन व्यवस्था वाढविण्यात येत असून पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. खासगी डॉक्टरांनी आवश्यक असलेल्या रेमडीसिविर इंजेक्शनची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी करावयाची असताना अनेक डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना प्रिस्क्रीप्शनमध्ये रेमडीसिवीर लिहून देत असून त्यावर कारवाई करण्याची सूचना खा.डॉ.कराड यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी केली. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरांना रेमडीसिवीरच्या योग्य वापराबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्याबाबतची सूचना यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. आ.श्री.सावे यांनी सिपेटमध्ये ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्याचे सूचित केले. आ.श्री.शिरसाठ यांनी मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे उपचार सुविधा सुरू करण्यासाठीची व्यवस्था असून तिथे उपचार केंद्र सुरू करण्याचे सूचित केले.

आ.श्री.बागडे यांनी खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्याबाबत त्यांना निर्देशीत करण्याचे सांगितले. खासदार इम्तियाज जलील, डॉ.भागवत कराड यांच्यासह सर्व प्रतिनिधींनी वाढीव उपचार सुविधांच्या प्रमाणात पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे असून त्यादृष्टीने भरती प्रक्रिया राबवावी.

प्रशासनाने घाटीमधील डॉक्टरांच्या रिक्त जागा कायमस्वरुपी भरण्यासाठी शासनाला पत्र देऊन पाठपूरावा करावा. जेणे करुन आवश्यक प्रमाणात डॉक्टर उपलब्ध होतील, असे सूचित केले. आमदार श्री.दानवे, श्री.राजपूत, श्री.बागडे यांनी ग्रामीण भागात उपचार सुविधा बळकटीकरणासोबतच जिल्हा परिषद यंत्रणांनी अधिक सक्षमपणे संसर्ग रोखणे आणि उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे सूचित केले. आमदार श्री.बोरनारे यांनी वैजापूर येथे एम.डी.फिजीशिअन डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा तसेच सिध्दनाथ वडगाव रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु केल्यास स्थानिक ग्रामीण रुग्णालयांची मोठी सोय होईल. तसेच तालुक्यातील खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी ज्यांचे प्रस्ताव प्राप्त आहेत त्यांना निकषपूर्तता तपासून मान्यता देण्याचे सूचित केले.

यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या जादा रकमेच्या देयकांची तातडीने तपासणी करुन त्यावर कारवाई करण्याचे सूचित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या