Thursday, April 25, 2024
Homeनगरयोग्य दिशा देणार्‍या गुरुजींची समाजाला गरज

योग्य दिशा देणार्‍या गुरुजींची समाजाला गरज

बेलापूर |वार्ताहर| Belapur

सरपंच, जि. प. सदस्य, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, पुढारी हे समाजाचे गुरुजी आहेत. या गुरुजींनी चांगले सांगितले तर समाजही ऐकतो. त्यामुळे समाजाला चांगल्या गुरुजीची आवश्यकता असल्याचे मत आदर्श गाव समितीचे सदस्य भास्कर पेरे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व बेलापूर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आदर्श गाव पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सुनील मुथा होते.

श्री. पेरे म्हणाले, गावाला शिस्त लावणे आपल्या हातात आहे. सर्वत्र वसुलीबाबत तक्रारी आहेत. लोक पट्टी भरत नाहीत. परंतु लोकांनी टॅक्स का भरावा? त्या बदल्यात आपण काय व किती सुविधा देतो. याचेही आत्मपरीक्षण झाले पाहिजे. चांगले राहणे, चांगले जगणे हा नागरिकांचा अधिकार आहे. गावाला स्वच्छ व साफ पाणीपुरवठा करा, गावात स्वच्छता ठेवा, बंदिस्त गटार करा, मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्या, घरातील, गावातील ज्येष्ठांची व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या, लोकांना आणखी काय हवे आहे.

सरपंच हा गावाचा माता पिता, विठ्ठल रुखमाई आहे, हे ध्यानात ठेवा. नागरिकांच्या जिवनाला फायदा होईल, अशा सुविधा पुरवा. लोकही सांगण्याच्या अगोदर टॅक्स भरतील. गाव व परिसरात झाडे लावा. शो ची झाडे लावण्यापेक्षा फळझाडे लावा. त्याची फळे आपली पुढील पिढीच चाखणार आहे. चांगले काम करताना अडथळे येतातच. आपले काम आपण निटनेटके करा, आरडाओरड करणारांकडे दुर्लक्ष करा. महिलांना आवश्यक त्या सुविधा पुरवा. महिलांमुळेच गाव प्रगती करतो. शौचालयाचा वापर करा, असेही ते म्हणाले.

यावेळी जि. प. सदस्य शरद नवले यांनी, गावात चाललेेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. सरपंच महेंद्र साळवी यांनी, बेलापूर ही मोठी ग्रामपंचायत असून वसुली नसल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. प्रा. ज्ञानेश गवले यांनी सूत्रसंचालन केले. देविदास देसाई यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या