..तर असं आहे सगळ, करोनावर प्रशांत दामले यांचा खुलासा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । Mumbai

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना करोनाची लागण झाली आहे. याचमुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. यासोबत ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

प्रशांत दामले यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हंटल आहे की, “मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला तेव्हा मला कणकण वाटत होती. त्यामुळे मी बुधवारी करोना टेस्ट करुन घेतली. त्यात मी काठावर पास झालो आहे. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काठावर जरी असलात तरीही सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला जावं लागेल. म्हणून मी बुधवारपासून सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. पण त्यामुळे झालंय काय की उद्या दुपारचा बोरीवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग हे रद्द करावे लागले आहेत. सध्या मी ठणठणीत आहे. पण डॉक्टर म्हणत आहेत की तुला सात दिवस विश्रांती घ्यावीच लागेल. सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट ही आहे की माझे सगळे सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टिस्ट हे ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरु करतो. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या.”

लॉकडाउनच्या काळात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. ते लवकर सुरु व्हावं यासाठी प्रशांत दामले आणि इतर नाट्यकर्मींनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर सरकारची परवानागी मिळाल्यानंतर १२ डिसेंबरला पुण्यात एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग झाला होता. तसंच चिंचवडलाही एक प्रयोग झाला होता. यानंतर प्रशांत दामले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना कणकण जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी बुधवारी करोना चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *