Friday, April 26, 2024
Homeनगरअभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण बोलताना भान ठेवून बोलावे

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण बोलताना भान ठेवून बोलावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे खरे आहे. मात्र, आपल्या बोलण्यातून, सोशल मीडियातून व्यक्त होण्यातून आपल्यावर आई-वडिलांनी केलेल्या संस्काराचे प्रदर्शन होत असते, हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिली.

- Advertisement -

बांदेकर त्यांच्या होम मिनिस्टर या टीव्ही मालिकेच्या महामिनिस्टर या पर्वाच्या ऑडिशनसाठी अहमदनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या कलाकारांच्या राजकीय दृष्टीने आणि अनेकदा खालच्या पातळीवरील भाषा वापरून व्यक्त होणार्‍यावरून वाद असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी या विषयावर बोलणार नाही. मीही अभिनेता असूनही संस्था आणि राजकीय पक्षातही काम करीत आहे. मात्र, ज्या त्या वेळी जी ती भूमिका करतो. एकमेकांशी गल्लत करीत नाही. त्यामुळेच ताठमानेने जगू शकतो. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याचा आधार घेऊन आपण काय बोलता याचे भान हवे. कारण आपल्या त्या व्यक्त होण्यातून आपल्यावर आई-वडिलांनी केलेल्या संस्करांचे प्रदर्शन होत असते.

प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. त्याप्रमाणे ते वागतात, बोलतात. मात्र, अशावेळीही आपले संस्कार विसरता कामा नयेत. मी हे तत्त्व पाळत आलो आहे. माझ्या भूमिकांना, मी करत असलेल्या संस्था आणि पक्ष आणि विशेष म्हणजे घरीही आवश्यक तो वेळ देऊन मी या सर्व भूमिका व्यवस्थित पार पाडत असतो. यात खूप मोठे समाधान असते. कधी कोणाचे वाईट चिंतू नये, वाईट बोलू नये. आपले जीवन ताठ मानेने जगले तर रात्री शांत झोप येते, हा अनुभव मी घेत आहे,फ असेही बांदेकर पुढे म्हणाले.

मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टच्या कामासंबंधी ते म्हणाले, माझ्यावर मोठ्या विश्वासाने या संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपणही त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. कामासाठी राज्यभर धावपळ सुरू असली तरी ट्रस्टची कामे प्रलंबित ठेवत नाही. गरीबांना मदत देण्याची कामे तर प्राधान्यांने करतो. आतापर्यंत अशा मदतीच्या 1 लाख 20 हजार धनादेशांवर आपण सह्या केल्या असतील. आत्महत्याग्रस्त शेतकरी, राज्यातील शहीद जवानांची मुले यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च ट्रस्टतर्फे केला जातो. याशिवाय नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदतही दिली जाते. ही सर्व कामे वेळेत होत आहेत,फ असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या