रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या हॉटेलवर कारवाईचा बडगा

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासनाचे निर्देश डावलून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणार्‍यांवर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा भाग म्हणून रात्री 11 नंतर सुरू असलेल्या हॉटेल व इतर आस्थापनांना नोटिसा बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली. तसेच शहरात रात्री उशिरापर्यंत विनाकारण गट, जमाव, घोळका करून बसणार्‍या युवकांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या काळात नगर शहरामध्ये मोहरम, दहीहंडी व गणेशोत्सव आदी सण व उत्सव साजरे होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी येत्या काळातील सर्व उत्सवांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून रात्री उशिरा शहरात विनाकारण फिरणार्‍या, घोळका करून बसणार्‍या युवकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच, रात्री अकरानंतर सुरू ठेवल्या जाणार्‍या हॉटेल्स व इतर आस्थापनांवर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत. याबाबतच्या नोटिसा बजाविण्यास सुरुवात झाली आहे. काही हॉटेल मालकांना कारवाईच्या नोटीसही बजावण्यात आल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *