शेती पंप वीज बिल वसुलीसाठी कारवाई

jalgaon-digital
3 Min Read

राहाता (तालुका प्रतिनिधी) –

राहाता तालुक्यातील गणेश परिसरातील शेतकर्‍यांवर संक्रात कोसळली. थकीत विज बिल भरण्यासाठी 50 हुन अधिक डिप्या बंद

करण्यात आल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला आहे.

राहाता तालुक्यात विज वितरण कंपनीकडून शेती पंपाचा विज पुरवठा बंद करण्यास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी राहाता, साकुरी आदी गावात 50 हून अधिक डिप्या बंद करण्यात आल्या. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट डीपी बंद करण्याची कारवाई सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेती पंपाची विज बिले थकीत झाली असताना अचानक पुर्ण विज बिलाच्या 50 टक्के रक्कम भरा व कृषी योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात येत आहे. अनेक वर्षापासून थकीत असलेली लाखो रूपयांची विज बिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरण्यासाठी शेतकर्‍यांची सध्या तरी आर्थिक परिस्थिती नाही. करोनाच्या लॉकडाऊन मुळे अगोदरच शेतकरी कफल्लक झाला त्यात अतिवृष्टी मुळे उभी पिके वाया गेली. सरकारने मदतीच्या केवळ घोषणा केल्या मात्र दमडीचीही मदत शेतकर्‍यांना मिळाली नाही. पेरू, डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीनचेही मातेरे झाले. दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची पंचायत शेतकर्‍यापुढे असताना लाखो रूपयांची थकीत विज बिले भरा अन्यथा शेती पंपाचा विज पुरवठा बंद यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

शेती पंपाचा विज पुरवठा खंडीत केल्याने उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गहू, हरबरा, जनावरांच्या चार्‍याची पंचायत होण्याची शक्यता असून अधिकार्‍यावर वरिष्ठ स्तरातून वसुलीचा दबाव वाढत असल्याने त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वीज पुरवठा बंद करण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाई त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. याबाबत शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही सुचना देण्यात आल्या नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहे.

राहाता तालुक्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला असून अतिवृष्टीमुळे सोयाबीन सह सर्व उभी पिके पाण्यात सडली. लॉकडाऊन मधे बाजारपेठा बंद असल्याने पेरू बागांचा पेरू सडून गेला. डाळींब बागाचेही मोठे नुकसान झाले. उभी पिके आहे त्यावरच सर्व आता अवलंबून आहे. ती पाण्याअभावी जळाली तर गंभीर प्रश्न निर्माण होईल. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाला. विज पुरवठा बंद केला तर शेतकरी पुर्णतः उध्वस्त होईल. त्याला आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही. वीज वितरण कंपनीने ही कारवाई त्वरित बंद करावी अन्यथा याप्रश्नी सर्व शेतकर्‍यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडू.

– मुकूंदराव सदाफळ, अध्यक्ष, गणेश साखर कारखाना

थकीत विज बिल भरण्यासंबंधी गेल्या काही दिवसात गावागावात बेठका घेतल्या. कृषी योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही शेती पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यास सुरूवात केली असून राहाता परिसरातील काही गावातील 50 हुन अधिक डिप्या बंद केल्याचे त्यांनी सांगीतले.

– डी. डी. पाटील, उपअभियंता विज वितरण

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *