कमावलेली संपत्ती तव्हे तर संतांचे विचार आयुष्यात नेहमी कामी येतील

jalgaon-digital
3 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

संपत्तीच्या वादाला घरातील वयोवृद्धच जबाबदार आहेत. मृत्यूपूर्वीच वाटण्या करून हा वाद मिटविण्याची नैतिक जबाबदारी त्यांची आहे. दुसरे असे की, आयुष्यात कमावलेली धनसंपत्ती कामी येईल ना येईल, पण संतांचे विचार नेहमी कामी येतील, असे परखड मत भारत गौरव प्राप्त आचार्य पुलकसागर महाराज यांनी व्यक्त केले.

ज्ञानगंगा महोत्सवाच्या समारोपाच्या प्रवचनात उपदेश करताना ते बोलत होते. यावेळी आ. लहु कानडे, विक्रीकर आयुक्त सुमेर काला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, नाशिकचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काला, बाबासाहेब दिघे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भारत गिडवाणी, गुजराती समाजाचे अध्यक्ष नारायणभाई पटेल, रोटरी एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष सुरेश पाटील बनकर, मुळे शाळेचे चेअरमन पुरुषोत्तम मुळे, अमित गांधी, प्रेमचंद कुंकलोळ, तिलक डुंगरवाल, विशाल बडजाते कोपरगाव, राजेंद्र लोंढे, दीपक कदम, भाजपचे प्रकाश चित्ते, अनिल चोरडिया, रमेश गुंदेचा, अ‍ॅड. अनिल कासलीवाल, सुनीता कासलीवाल, डॉ. सतीश कोठारी, कैलास गंगवाल, डॉ. रविंद्र जगधने, डॉ. स्वप्नील पुरनाळे उपस्थित होते.

आचार्य पुलकसागर यांनी संपत्तीवरून होणार्‍या वादाला वाचा फोडली. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला काय द्यायला हवे याचे विवेचन करताना त्यांनी भगवान महावीर, गौतम बुद्ध, प्रभू श्रीराम यांचे दाखले दिले. मृत्यूपूर्वी घर व्यवस्थित करणे याची नैतिक जबाबदारी घरातील वृद्धांची आहे. तुमच्यानंतर वाद सोडून जाऊ नका. जिवंतपणीच संपत्तीचा वाद मिटवा. घराच्या चावीसाठी सुनेला सासूच्या मरण्याची वाट पहायला लावू नका. दुसरीकडे मुलांनी वडिलांनी जे दिले त्यापेक्षा जास्त करून दाखवत आपले कर्तृत्व सिद्ध करावे. ज्याप्रमाणे भगवान महावीरांनी आमच्यासारख्या संतांना खूप काही दिले. त्यात आम्ही वृद्धी करून ती संपदा पुढच्या पिढीला सोपवत वाटचाल करत आहोत. मी चर्च, गुरुद्वारा व शिर्डीलाही प्रवचन करेल. संत आपसात भेद करत नाही. माझ्यासारख्या सामान्य मुलाला आचरणाची मिळालेली संपत्ती संत बनून गेली, याचे सविस्तर वर्णन त्यांनी यावेळी केले.

जैन समाजात भिक्षा मागताना कोणी दिसत नाही. कारण प्रत्येकजण त्याच्या परीने मेहनत करत असतो. त्याचप्रमाणे मंदिरात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका, कारण आपण जे काही देवाला अर्पण करतो त्याच्या दहा पटीने आपल्याला परत मिळत असते. आपल्या मुलाला महात्मा करू नका, पण चांगले संस्कार नक्की द्या. मुलाला इतके मोठे बनवा की, तो विद्वानाच्या पंक्तीत पुढे बसू शकेल. तसेच मुलांचेही कर्तव्य आहे की, आपल्या वडिलांना मानसन्मान दिला पाहिजे. समाजात मुली कमी आहे म्हणून आवई उठवली जाते. मात्र मुले दहावी, बारावी अनुत्तीर्ण होऊन दुकानात बसतात. मुलीच्या लायक मुले नसल्याने सुरू असलेला अपप्रचार थांबला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी दिगंबर जैन समाज अध्यक्ष संजय कासलीवाल, अनिल पांडे, समाजाचे अध्यक्ष रमेश लोढा, मूर्तिपूजक समाजाचे अध्यक्ष शैलेश बाबरिया, दिगंबर जैन समाज विश्वस्त महावीर काला, अ‍ॅड. सुहास चुडीवाल, प्रशांत पाटणी, जितेंद्र कासलीवाल, गुलाबचंद झाजरी, पंकज पांडे, अमित गोधा, नितीन मिरीकर, प्रशांत बोरा, मयूर पाटणी, चंदन महिला मंडळाच्या अध्यक्ष सुनीता चुडीवाल, बहुबेटी मंडळाचे अध्यक्ष निर्मला पांडे, पाठशाळा प्रमुख प्रिया अग्रवाल, वीर सेवा दलाचे अध्यक्ष प्रीतम पांडे, तसेच नवयुवक मंडळ, महावीर युवामंच, जैन ड्युटी आदींनी परिश्रम घेतले. स्वागत अनिल पांडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले तर संजय कासलीवाल यांनी आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *