मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी कानी पडताच आईनेही सोडला जीव

jalgaon-digital
2 Min Read

राजुरी |वार्ताहर| Rajuri

मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी कानी पडताच आईला तो धक्का सहन न झाल्याने हृयदयविकाराचा तीव्र झटका येऊन काही तासांतच आईनेही जीव सोडला. या घटनेने प्रवरानगर व लोणी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांचाही अंत्यविधी एक़ाचवेळी प्रवरानगर येथील अमरधाममध्ये करण्यात आले. हा हृदयद्रावक प्रसंग पाहण्यासाठी नागरिकांनी अमरधाममध्ये मोठी गर्दी केली होती.

मंगळवारी संध्याकाळी लोणीहून प्रवरानगर येथील आपल्या घरी जाण्यासाठी राजेंद्र दत्तात्रेय गागरे हे निघाले होते. राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रोडवर, प्रवरानगर येथील आहेर वस्ती (लोणी खुर्द) येथे अपघात झाला. या अपघातात राजेंद्र दत्तात्रय गागरे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी मृतदेह लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठविला होता. बुधवारी सकाळी त्यांच्या शवविच्छेदनानंतर राजेंद्र गागरे यांचा अंत्यविधी होणार होता. याचदरम्यान त्यांच्या आई नलिनी दत्तात्रेय गागरे यांना या घटनेची माहिती कळाली. मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळाल्यानंतर त्यांना मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांनाही ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यात आले; परंतु त्यांचेही निधन झाले. मुलाचा आणि आईचा एकाच दिवशी मृत्यूची बातमी कळतात परिसरातील नागरिकांनी एक़च गर्दी केली होती. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून नागरिकांनाही अश्रू आवरता आले नाहीत.

काल बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर येथील अमरधाममध्ये या दोघांचाही अंत्यविधी एकाच वेळी करण्यात आला. या अंत्यविधीसाठी प्रवरा परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घडलेल्या घटनेमुळे प्रवरा परिसरात शोककळा पसरली असून नलिनी गागरे या प्राथमिक शाळेच्या बर्‍याच कालावधी मध्ये प्रवरानगर येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या व त्यांचे पती स्वर्गीय दत्तात्रेय गागरे हेसुद्धा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते.

राजेंद्र गागरे हा एलआयसी एजंट असल्यामुळे या दोन्ही व्यक्ती या प्रवरा परिसरात परिचित असल्यामुळे त्यांच्या विषयी नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून स्वर्गीय राजेंद्र गागरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिणी, मेहुणे असा परिवार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *