Sunday, May 5, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने भादंवि कलम 376 (2) (जे) (एन) अन्वये दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरफराज इकबाल शेख (वय 19 रा. बोरावकेनगर, दौंड, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी अरबाज भैय्या खान याला भादंवि कलम 506 अन्वये दोषी धरून एक वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. श्रीगोंदा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. एस. शेख यांनी हा निकाल दिला. अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले.

जानेवारी 2021 मध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना अरबाज खान हा सरफराज शेख याला घेऊन आला होता. त्यावेळी मुलीचे आई-वडिल बाहेर गेलेले होते. अरबाजने मुलीची सरफाराज सोबत ओळख करून देऊन त्याच्याशी बोलत जा असे सांगितले. सरफराज हा मुलीस म्हणाला,‘तु मला फार आवडते, माझ्या सोबत प्रेम कर’, असे म्हणाला असता मुलीने त्यास नकार दिला. त्यावर अरबाज मुलीला म्हणाला,‘तु जर सरफराज सोबत प्रेम केले नाही तर मी तुझे आई-वडिलांना तुझे सरफराज सोबत अफेअर असल्याचे खोटे सांगेन’, अशी धमकी दिली. त्या भितीपोटी मुलीची इच्छा नसताना देखील दुपारी अरबाज व सरफराज यांनी मुलीस अरबाजच्या घरी नेले. तेथे सरफराजने मुलीवर तिच्या इच्छेविरूध्द बळजबरीने शरीरसंबंध केले. त्यावेळी अरबाज हा घराचे बाहेर थांबला होता.

मार्च 2021 मध्ये सरफराज याने पुन्हा पिडीत मुलीवर तिच्या इच्छेविरूध्द शारिरीक अत्याचार केला. 10 जून, 2021 रोजी पीडीत मुलगी हिच्या वैद्यकिय तपासणीत ती 22 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत 17 जून, 2021 रोजी पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सरफराज व अरबाजविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित माळी यांनी केला व आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. दत्तात्रय झराड यांनी सरकार पक्षांस सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या