‘मिस्टर ३६०’ एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

दिल्ली l Delhi

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिविलियर्सने (AB de Villiers) मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. यामुळे आता दक्षिण आफ्रिकेसोबतच तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून देखील खेळताना दिसणार नाही.

३७ वर्षीय डिविलियर्सने निवृत्ती घेतानाचा निर्णय जाहीर करताना भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हा खूप अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये.’

‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना मला क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेता आला. ११ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही. कटू-गोड आठवणींचा ठेवा सोबत घेऊन मी क्रिकेटचा निरोप घेत आहे. निवृत्तीचा निर्णय घेणं हे माझ्यासाठी नवीन नसलं तरी कठीण होतं. पण माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवण्यासाठी मी अखेर निवृत्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. मी RCB च्या संघ व्यवस्थापनाचे, माझा मित्र विराट कोहलीचे आणि साऱ्यांचे आभार मानतो’, असं डिव्हिलियर्सने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले.

एबीने डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेकडून ११४ कसोटी सामन्यात ५०.७च्या सरासरीने ८ हजार ७६५ धावा केल्या आहेत. २२८ वनडेत ५३.५च्या सरासरीने ९ हजार ५७७ धावा तर ७८ टी-२० सामन्यात ३९.७ च्या सरासरीने आणि १३५.२च्या स्ट्राईक रेटने १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूकडून खेळणाऱ्या एबीने १८४ सामन्यात १५१.७च्या स्ट्राईक रेटने ५ हजार १६२ धावा केल्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *