Friday, April 26, 2024
Homeनगर70 व्या वर्षी इंजिनिअर होण्याचे स्वप्न केले पूर्ण

70 व्या वर्षी इंजिनिअर होण्याचे स्वप्न केले पूर्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आधुनिकतेची काहीही कल्पना नसतानाही केवळ चिकाटी, कष्ट व आत्मविश्वासाच्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन 35 वर्षाच्या

- Advertisement -

नगरपालिकेच्या सेवेच्या सेवानिवृत्तीनंतरही वयाच्या 70 व्या वर्षीही 92.47 टक्के गुण मिळवून इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. नामदे यांनी आजच्या तरुण पिढीपुढे एक चांगला आदर्श समोर ठेवला नाही तर या वयात एवढे गुण मिळवून त्यांनी एक विक्रमच प्रस्थापित केला आहे.

लक्ष्मणराव चिमाजी नामदे नगरपालिकेच्या प्रदीर्घ सेवेतून 2018 साली सेवानिवृत्त झाले. तसे ते 2016 सालीच निवृत्त झाले होते. परंतु त्यांच्या कामाचा उरक, आवड आणि त्यांचा अनुभव पहाता स्व. जयंतराव ससाणे यांनी पुन्हा पालिकेत काम करण्यास सांगितले. आणि ते 2018 साली सेवानिवृत्त झाले.

काहीना काही काम करण्याचा आनंद ते घेत गेले. मुलगा क्लासवन अधिकारी असताना निवृत्तीनंतर आरामशीर जीवन जगणे शक्य असतानाही श्री. नामदे यांनी इंजिनिअरींगला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकाना चकितच करणारा होता. त्यांनी अगोदर अभियंता या विषयात आयटीआय पूर्ण करून प्रथम वर्ष पूर्ण केले होते. मात्र नोकरीमुळे पुढे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही.

वयाच्या 70 व्या वर्षी राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. तरी त्यांनी हार मानली नाही. वरिष्ठ पातळीवर संघर्ष करून त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविलाच ! त्यांना बोटा येथील विद्यानिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या 40 वर्षांनंतर पुन्हा अभ्यास, प्रॅक्टीकल या सर्वांना जुळवून घेण्याचे काम म्हणजे खूपच अवघड असे होते.

पण हार न मानता स्वप्न पूर्ण करण्याचा दृढनिश्चय व परिश्रम करण्याची तयारी, उत्साह, चिकाटी, ध्यास घेत श्री. नामदे यांनी एक एक सत्र नुसते उत्तीर्णच न होता प्रत्येक सत्रात यशाचा आलेख चढताच ठेवला व अंतिम सत्रात त्यांनी 92.47 टक्के गुण मिळवून वयाच्या 70 व्या वर्षी या विद्यार्थ्यांने बोर्डामध्ये इतके गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा कदाचित इतिहासात एक विक्रमच प्रस्थापित केला आहे.

त्यांच्या या यशात साई क्लासचे संचालक विशाल निंभोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आजच्या तरुण पिढीने निराश न होता ध्येय व चिकाटीच्या जोरावर श्री. नामदे यांचा आदर्श घेऊन यशस्वी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या